साडेतीनशे एकरांसाठी केवळ १५ कर्मचारी

By Admin | Updated: June 24, 2014 01:08 IST2014-06-24T00:47:25+5:302014-06-24T01:08:10+5:30

गजानन दिवाण , औरंगाबाद तब्बल ३५० एकरावर विस्तारलेल्या ऐतिहासिक हिमायत बागेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे फळ संशोधन केंद्र चालविले जाते.

Only 15 employees for 3.5 acres | साडेतीनशे एकरांसाठी केवळ १५ कर्मचारी

साडेतीनशे एकरांसाठी केवळ १५ कर्मचारी

गजानन दिवाण , औरंगाबाद
तब्बल ३५० एकरावर विस्तारलेल्या ऐतिहासिक हिमायत बागेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातर्फे फळ संशोधन केंद्र चालविले जाते. मात्र, येथील कर्मचारी संशोधनाशिवाय वेगळ्याच कामात गुंतले आहेत. रिकामटेकड्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, त्यांची घुसखोरी थांबविणे, अतिक्रमणाला आळा घालणे, कोणी जबरदस्ती करीत असतील तर कोर्टात खेचणे, अशी ही कामे करताना मनुष्यबळाचीही मारामार. त्यामुळे ना फळ संशोधन व्यवस्थित होते ना बागेची देखभाल. साऱ्याच बाबतीत आनंदीआनंद आहे.
‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपासून हिमायत बागेतील सुरक्षेचा मुद्दा मांडला जात आहे. बाहेरील लोकांना मिळालेले अतिस्वातंत्र्य हेच या बागेच्या जीवावर उठले आहे. मॉर्निंग वॉकला येणारे लोक वेगळे. दुपारी आरामासाठी येणारे वेगळे. गुंड-बदमाश, मैत्रिणीला घेऊन येणारे वेगळेच, अशा रिकामटेकड्यांची मोठी फौज हिमायत बागेला आणि तेथील पक्ष्यांना संपविण्याच्या मार्गावर आहे. बागेच्या सुरक्षा भिंतीला अनेक ठिकाणी छिद्र पाडून घुसखोरी सुरू आहे. केवळ माणसेच नव्हे, तर जनावरांच्या चराईसाठीदेखील या बागेचा वापर केला जात आहे. संशोधनासोबतच या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नाही. अशा रिक्त जागांची यादीच विद्यापीठाकडे ३० मे रोजी पाठविण्यात आली असल्याची माहिती फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. टी. बी. तांबे यांनी ‘लोकमत’ला दिली.
एवढ्या मोठ्या परिसरात विस्तारलेल्या या बागेचा डोलारा केवळ ९५ माणसांवर चालायचा. त्यातलेही जवळपास ५० टक्के लोक दुसऱ्याच कार्यालयात आहेत. उपलब्ध मनुष्यबळात ५० टक्के पन्नाशी ओलांडलेले आहेत. म्हणजे कोण कोणाची काळजी घेणार? साधारण १५ लोकांच्या भरोशावर या बागेचा कारभार चालत आहे. प्रचंड संख्येने येणाऱ्या रिकामटेकड्या माणसांना अवघे १५ जण कसे आवरू शकणार, असा प्रश्न संशोधन केंद्रातील एका अधिकाऱ्याने उपस्थित केला.
काही वार्षांपूर्वी अतिक्रमण थांबविण्याचा प्रयत्न झाला. कार्यालयावरच हल्ला झाला. तोडफोडही झाली. लोकांना असे करू नका, म्हणण्याची सोय राहिली नाही. त्यामुळे बागेचे नुकसान होत असूनही काही करू शकत नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. हे असेच सुरू राहिले, तर बाग नामशेष व्हायला वेळ लागणार नाही, ही शक्यतादेखील या अधिकाऱ्याने बोलून दाखविली.
बागेची भिंत तोडून चार ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. बागेत जवळपास १८ विहिरी आहेत. सर्वच ठिकाणी पाणी आहे. शक्कर बावडीचे पाणी तर कधीच आटले नाही. येथे पोहायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना येऊ नका म्हणता येत नाही, अशा इतर कामावरच कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. त्यामुळे फळ संशोधनावर म्हणावे तसे काम करता येत नाही, अशी खंत या अधिकाऱ्याने बोलून दाखविली.
बोर्डाच्या नियुक्तीनंतर होणार भरती
हिमायत बागेतील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत पत्र मिळाले आहे. तशी यादीदेखील मिळाली आहे. पूर्वीप्रमाणे आता विद्यापीठस्तरावर भरती करता येत नाही. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या भरतीसाठी पुण्यात एक बोर्ड नियुक्त केले जाते. त्यानंतरच भरती केली जाते. या बोर्डाच्या नियुक्तीची आम्ही वाट पाहत असल्याची माहिती वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी ‘लोकमत’ला दिली. (समाप्त)
काय करणार ?
कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होताच बागेच्या सर्व बाजूची संरक्षक भिंत चांगल्या पद्धतीने बांधली जाईल. नव्याने अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. बागेत प्रवेश करण्यासाठी ठराविक गेट उपलब्ध करून दिले जातील. याद्वारे ठराविक वेळेत मॉर्निंग वॉकला परवानगी दिली जाईल.
भविष्यात त्यावरही नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीची गरज असल्याचे
डॉ. टी.बी. तांबे यांनी सांगितले. बागेला, यातील पक्षी-प्राण्यांना वाचवायचे असेल, तर अशी कठोर पावले उचलावी लागतील, असे ते म्हणाले.
सर्वसामान्यांना प्रवेशबंदी हवी
बागेत येणाऱ्या लोकांवर आळा घालण्याची गरज आहे. मॉर्निंग वॉकसाठी शेजारी मजनू हिल आहे. जवळच स्वामी विवेकानंद बाग आहे. ऐतिहासिक हिमायत बाग वाचविण्यासाठी लोकांनी या पर्यायी जागांचा वापर करावा, असे आवाहन पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केले. या बागेत सर्वसामान्यांना प्रवेश बंद केला, तर तेथील फळबाग संशोधनाला गती येईल. सोबतच तेथील पक्ष्यांचे जगणेही सोयीचे होईल, असे ते म्हणाले.

Web Title: Only 15 employees for 3.5 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.