मनरेगाच्या मजुरांना आॅनलाईन मजुरी
By Admin | Updated: May 22, 2014 00:32 IST2014-05-22T00:25:20+5:302014-05-22T00:32:43+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना आता त्यांची मजुरी त्यांच्या खात्यामध्ये आॅनलाईन मिळणार आहे़

मनरेगाच्या मजुरांना आॅनलाईन मजुरी
विठ्ठल भिसे, पाथरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना आता त्यांची मजुरी त्यांच्या खात्यामध्ये आॅनलाईन मिळणार आहे़ यामुळे मजुरीसाठी तालुक्याला भटकंती कराव्या लागणार्या मजुरांना दिलासा मिळाला आहे़ योजनेमध्ये दलाली करणार्या दलालांनाही यामुळे चाप लागणार आहे़ केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये २००८ पासून करण्यात येत आहे़ या योजनेंतर्गत मजुरांना काम मिळावे हा प्रमुख उद्देश ठेऊन ही योजना कार्यान्वित करण्यात आली़ योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकास कामेही मार्गी लागली़ त्याचबरोबर ग्रामपंचायतींना या योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध होऊ लागला़ कामासाठी मजुरांच जॉबकार्ड नोंदणी तसेच त्यांचे बँक खाते उघडे या प्रक्रिया ग्रामरोजगार सेवकांमार्फत करण्यात येत असल्याने मजुरीबाबतही ग्रामपंचायतीवर ताण पडत होता़ शासनाने या योजनेमध्ये मागील काही वर्षांत अमूलाग्र बदल केले़ त्याचबरोबर कामे व्हावेत या उद्देशाने अनेक अटीही शिथील करण्यात आल्या आहेत़ सुरुवातीला ग्रामरोजगार सेवकांनी दाखल केलेल्या मस्टरवरून मजुरांचे पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे जमा व्हायचे़ यामुळे धनादेश केव्हा मिळणार याची प्रतीक्षा मजुरांनाही असायची अणि मजुरांना त्यांच्या मजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये खेटेही मारावे लागत असे़ ही बाब लक्षात घेता शासनाने मनरेगाच्या कामावरील मजुरांना त्यांच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने पेमेंट जमा करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली़ यामुळे आता मजुरांना त्यांच्या खात्यात पैसे परस्पर जमा होऊ लागले आहेत़ पर्यायाने या योजनेचा ग्रामपंचायतचा अधिक भार कमी झाला़