आॅनलाईन अर्ज, नूतनीकरणास मिळाली मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:57 IST2017-09-07T23:57:27+5:302017-09-07T23:57:27+5:30
ल्पसंख्याक समाजातील प्रि-मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आता आॅनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे.

आॅनलाईन अर्ज, नूतनीकरणास मिळाली मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अल्पसंख्याक समाजातील प्रि-मेट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आता आॅनलाईन अर्ज भरणे व नुतनीकरणास ३० सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ मिळाली आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर एक हजार रुपये रक्कम जमा केली जाते. ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख होती. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, तसेच एकही विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार याची काळजी घेत शासनाकडून अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच प्रलंबित होती. शाळांना वारंवार पत्र व संबंधित यंत्रणेस सूचना दिल्याने त्यापैकी २४५१ च्यावर विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉग इनला प्राप्त झाली असून उर्वरित कामे सुरू असल्याचे सांग्ण्यात आले. परंतु मुदतवाढ देऊनही पात्र विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन किंवा नूतनीकरणास कसूर केल्यास गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे.