एकतर्फी प्रेमातून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: March 10, 2016 00:46 IST2016-03-10T00:29:21+5:302016-03-10T00:46:55+5:30
ढोकी : एकतर्फी प्रेमातून युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

एकतर्फी प्रेमातून युवकाची आत्महत्या
ढोकी : एकतर्फी प्रेमातून युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, वाखरवाडी येथील राजेंद्र थोरात यांचा मुलगा सूरज हा मुरुड येथील जनता महाविद्यालयात बारावीच्या वर्गात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परंतु, मंगळवारी सूरज हा परीक्षा देवून आला. घरी थोडावेळ थांबून पुन्हा बाहेर गेल्यानंतर मात्र तो परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बाळासाहेब शिंदे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना सूरजच्या खिशात तीन ओळींची चिठ्ठी आढळून आली. यात ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी धरु नये. मी स्वत: आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहिला होता. यावरून एकतर्फी प्रेमातून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, अधिक तपास पोहेकॉ बी. एन. कदम करीत आहेत. (वार्ताहर)