सात मुलांमागे एकास कर्णदोष !
By Admin | Updated: March 19, 2015 23:55 IST2015-03-19T23:48:40+5:302015-03-19T23:55:14+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात जन्मास येणाऱ्या प्रत्येक नवजात अर्भकाची ‘ओएई’ मशीनद्वारे श्रवण क्षमतेची तपासणी करण्यात येत आहे़

सात मुलांमागे एकास कर्णदोष !
उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात जन्मास येणाऱ्या प्रत्येक नवजात अर्भकाची ‘ओएई’ मशीनद्वारे श्रवण क्षमतेची तपासणी करण्यात येत आहे़ या मशीनद्वारे २ हजार ३७९ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यात ३१९ जणांमध्ये कर्णदोष आढळून आले आहेत़ कर्णदोष आढळून आलेल्या मुलांवरील उपचारामुळे त्यांच्या आजाराचे निदान होण्यास मोठी मदत होत आहे़ विशेषत: नवजात अर्भकाची श्रवणक्षमता तपासण्याची ही मशीन केवळ जिल्हा रूग्णालयातच उपलब्ध आहे़ एकूणच सात मुलांमागे एकास कर्णदोष असल्याचे समोर आले.
अनेक बालकांमध्ये असलेले कर्णदोष हे त्यांच्या वयाच्या दीड-दोन वर्षानंतर समोर येवू लागतात़ त्यानंतर पालकांकडून धावपळ सुरू होते़ अनेक दोष हे उशिराने लक्षात आल्यानंतर बरे होत नाहीत़ किंबहुना बालकासह अवघ्या कुटुंबालाही याचा त्रास सहन करावा लागतो़ मात्र, केंद्र शासनाकडून सन २०१२ पासून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमामुळे बालकांमधील कर्णदोष समोर येवू लागले आहेत़ ‘ओएई’ या अत्याधुनिक मशीनचा अनेक बालकांना लाभ होताना दिसत आहे़ जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागातील ही यंत्रणा कार्यान्वित आहे़ कर्णदोष हे तीन प्रकारचे असतात़ यात ‘कंडक्टीव्ह हेअरिंग लॉस, मिक्सड् हेअरिंग लॉस व सेन्सरी न्यूरल’ असे तीन प्रकार आहेत़ यातील पहिला व दुसऱ्या प्रकारातील आजार हा वेळेत लक्षात आला तर तो बरा होतो़ परिणामी त्या बालकाला भविष्यात होणाऱ्या अनेक त्रासापासून बचाव करता येतो़
जिल्हा रूग्णालयात ही मशीन जून २०१३ पासून कार्यान्वित करण्यात आली़ जून ते डिसेंबर २०१३ या कालावधीत १२५० बालकांची तपासणी करण्यात आली असून, यात १२९ बालकांमध्ये कर्णदोष आढळून आले़ जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत १०२७ बालकांची तपासणी करण्यात आली होती़ यात १६३ जणांमध्ये कर्णदोष आढळून आले़ तर जानेवारी-फेब्रुवारी २०१५ या कालावधीत १०२ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यात २७ जणांमध्ये कर्णदोष आढळून आले आहेत़ (प्रतिनिधी)