रेल्वेतील महिलेच्या खून प्रकरणात एकास अटक
By Admin | Updated: March 20, 2016 23:38 IST2016-03-20T23:32:40+5:302016-03-20T23:38:28+5:30
परभणी : मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करताना रेल्वेतील एका महिलेचा ८ नोव्हेंबर २०१५ रोजी परभणी-पूर्णा रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे खून झाला होता़

रेल्वेतील महिलेच्या खून प्रकरणात एकास अटक
परभणी : मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करताना रेल्वेतील एका महिलेचा ८ नोव्हेंबर २०१५ रोजी परभणी-पूर्णा रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे खून झाला होता़ या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी १९ मार्च रोजी पुणे येथून एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव बेसले यांनी दिली़
हिंगोली तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या सविता मल्लिकार्जुन कापसे (वय ३३) या अकोला-परळी रेल्वेने ८ नोव्हेंबर रोजी भाऊ प्रभू पाटील व ११ महिन्यांच्या मुलासोबत परळीला निघाल्या होत्या़ पिंगळी स्थानकावर रात्री ८़५० च्या सुमारास दोन चोरट्यांनी रेल्वे डब्यात शिरून सविता कापसे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला़ या घटनेत झालेल्या मारहाणीत सविता कापसे यांना चाकू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेचा तपास चार ते पाच महिने लागला नव्हता़ १५ मार्च रोजी रेल्वेचे पोलिस निरीक्षक वासुदेव बेसले यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला़ अवघ्या चार दिवसांत पोलिस निरीक्षक बेसले यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला़ घटनेतील आरोपी परभणी येथील रहिवासी असून, तो पुणे येथे एका खानावळीत काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच १९ मार्च रोजी पोलिसांनी सुनील खंदारे (वय २४) यास ताब्यात घेतले़ सुनील खंदारे यास सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रेल्वे पोलिस विभागाचे पोलिस अधीक्षक राजीव जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला़ (प्रतिनिधी)