वन अधिकाऱ्याची वाहतूक पोलिसांना धमकी
By Admin | Updated: July 26, 2016 00:13 IST2016-07-26T00:07:09+5:302016-07-26T00:13:06+5:30
औरंगाबाद : आपण मोठे अधिकारी आहोत, वाहतूक पोलीस हा आपल्यासमोर किरकोळ माणूस आहे, अशा आविर्भावात भरचौकात वाहन अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाला वनखात्याच्या अधिकारी आणि त्यांच्या चालकाने शिवीगाळ

वन अधिकाऱ्याची वाहतूक पोलिसांना धमकी
औरंगाबाद : आपण मोठे अधिकारी आहोत, वाहतूक पोलीस हा आपल्यासमोर किरकोळ माणूस आहे, अशा आविर्भावात भरचौकात वाहन अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाला वनखात्याच्या अधिकारी आणि त्यांच्या चालकाने शिवीगाळ करून झटापट केल्याने खळबळ उडाली आहे. बसस्थानक रोडवरील कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नलवर सोमवारी दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास ही घटना झाली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह त्याच्या वाहनचालकास अटक झाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी लिमचंद राठोड (५७, रा. समर्थनगर) आणि चालक अनिल चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण धोटे आणि हवालदार कल्याण हिवाळे हे सोमवारी सकाळी कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नल येथे कामावर होते. यावेळी महावीर चौकाकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीप (क्रमांक एमएच-१९ बीजे ५८४५) चालकाने सिग्नल तोडून चौकातच वाहन उभे केले. त्यामुळे पोकॉ. धोटे यांनी चालक चव्हाण यास पावती घेण्यास सांगितले. त्यावेळी जीपमध्ये अधिकारी राठोड बसलेले होते. त्यांनी गाडीतूनच धोटे यांना उद्देशून ‘तू बाजूला सरक’ असे म्हणून शिवीगाळ केली. धोटे यांनी राठोड यांना खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा राठोड यांनी दोन्ही पोलिसांना अर्वाच्य भाषेत ‘तिकडे चोर चालले व तुम्ही आम्हाला काय पकडता? मी एक रुपयाचा दंड न भरता तुम्हा दोघांना ऊठबशा मारायला लावतो. मी मोठा अधिकारी असून, तुम्हा दोघांना बघून घेतो, तुमचे नाव व नंबर सांगा, तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी धमकी दिली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण कक्षाला कळविली. याठिकाणी नागरिकांची गर्दी जमली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिरारी हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पो.कॉ.धोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राठोड आणि चव्हाण यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व झटापट करून जिवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड आणि चालक चव्हाण यांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.