तलावात दहा लाख मत्स्यबीज
By Admin | Updated: July 28, 2014 00:58 IST2014-07-28T00:16:58+5:302014-07-28T00:58:20+5:30
भोकरदन : तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या तलावात सुमारे दहा लाख एवढे मत्स्यबीज टाकण्यासाठी मच्छिमारांनी लगबग सुरू केली आहे़

तलावात दहा लाख मत्स्यबीज
भोकरदन : तालुक्यातील पाणीसाठा असलेल्या तलावात सुमारे दहा लाख एवढे मत्स्यबीज टाकण्यासाठी मच्छिमारांनी लगबग सुरू केली आहे़
तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक पाझर तलावांत काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे येथे मत्स्यबीज सोडण्यात येत आहेत.
तालुक्यातील जुई, धामणा , पदमावती, बाणेगाव, चांदई एक्को, रेलगाव येथील मध्यम प्रकल्पासह दगडवाडी, गोकुळ,हासणाबाद, बाभुळगाव, कोदोली, लिंगेवाडी या परिसरातील पाझर तलावात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या तलावामध्ये जून महिन्यांत मत्सबीज सोडण्यात येते. मात्र यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्यामुळे तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून मच्छिमारांनी तलावामध्ये बिज सोडण्यास सुरूवात केली आहे.
तालुक्यात कटला, राहू, मिरगल, सुपरनखा, मांगूर या जातीच्या माशांना जास्त मागणी असल्याने कलकत्ता येथून या जातीचे बीज डब्याची मागणी करीत असल्याचे मच्छिमार सोसायटीचे हिरासेठ सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी यांनी सांगतिले.
ग्रामीण भागातील प्रत्येक मच्छिमार काही बीज खरेदीसाठी कलकत्ता येथे जाऊ शकत नाही. त्यामुळे कलकत्ता येथून भुसावळपर्यंत या मत्स्यबीज आणले जातात. तेथून आम्ही भोकरदन येथे किरकोळ व्यावसाकिांना देतो. यामध्ये प्रत्येक जातीच्या मत्सबिजाचे भाव वेगवेगळे आहेत. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १ हजार बीज असतात. ती पिशवी २०० रूपयांना विक्री होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. जुलै महिन्यात तलावात सोडण्यात आलेले हे बीज सहा महिन्यांनंतर ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकते असे हिरा सूर्यवंशी यांनी सांगितले़ मत्स्यबीज वाढीसाठी दमदार पावसाची आवश्यकता असून, जलसाठा वाढणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
शासनाने मार्गदर्शन करावे....
तालुक्यात मत्स्यबीज सोडण्यासाठी अनेक शेतकरी तसेच मासेमार उत्सुक असतात. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी हा व्यवसाय करता येत नाही. मत्स्य व्यवसाय विभागने विशेष शिबीर अथवा मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांनाही या जोडधंदा ठरु शकतो.
मत्स्यबीज सोडले तरी जलसाठ वाढणे अत्यंत गरजेचे आहे. गत काही वर्षांपासून मोठ्या पावसाअभावी मच्छीमारांचे मोठे हाल होत आहे. मासे उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.