अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:46 IST2019-04-20T23:46:19+5:302019-04-20T23:46:30+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात घडली.

 One killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात घडली. संदीप छगन नरवडे (३०) असे मृताचे नाव आहे.


संदीप नरवडे हा कुटुंबासह वडगाव कोल्हाटी येथील सीतानगरात वास्तव्यास असून, तो वाहनचालक म्हणून काम करतो. औरंगाबाद येथे रविवारी संदीपच्या आतेभावाचे लग्न आहे. शुक्रवारी रात्री संदीपची आई फुलं व हार घेवून लगीनघरी नातेवाईकाकडे गेली होती. रविवारी सकाळी आईला घरी सोडून संदीप व आतेभाऊ गौतम दामोदर बोराडे हे वडगावहून दुचाकीवरुन (एमएच- २०, सीएन- ५८३७) शहरात जात होते. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरात जात असताना एएस क्ल्ब चौकात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

यात संदीप व गौतम गंभीर जखमी झाले. इतर वाहनधारकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस व संदीपचा भाऊ अशोक नरवडे यास घटनेची माहिती दिली. दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून संदीप नरवडे यास मृत घोषित केले. गौतम बोराडे याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत संदीप हा विवाहित असून, त्याला दहा वर्षांचा एक मुलगा आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  One killed in an unknown vehicle