दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जण गंभीर
By Admin | Updated: March 24, 2017 23:52 IST2017-03-24T23:50:05+5:302017-03-24T23:52:47+5:30
मसलगा : कवठा पाटी येथे गुरुवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जण गंभीर
मसलगा : निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसलगा येथील दोघे जण लातूरहून मसलगा गावाकडे गुरुवारी रात्री दुचाकीवरुन (एम. एच. १४ डी. वाय. २२७५) निघाले होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कवठा पाटी येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता, सुरेश माणिकराव पाटील (५०) यांचा मृत्यू झाला. तर किसन विठ्ठलराव आरेराव (३७) हे गंभीर जखमी झाले असून, पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी मयत सुरेश पाटील यांच्या पार्थिवावर मसलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.