‘वन डे मॅरेज’चा धूमधडाका !
By Admin | Updated: April 9, 2015 00:14 IST2015-04-08T23:49:22+5:302015-04-09T00:14:48+5:30
संजय तिपाले , बीड ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात?

‘वन डे मॅरेज’चा धूमधडाका !
संजय तिपाले , बीड
‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात? हे मुलीच्या लग्नावेळीच कळते. आता मात्र, वधू- वरपित्यांचे काम बऱ्याच प्रमाणात हलके झाले आहे. कारण ‘ट्रेंड’आहे (गेटकेन) ‘वनडे मॅरेज’चा! एकदा ‘ठरले’ की साखरपुड्यातच लग्नाचा बार उडविला जातो. पंगतींऐवजी ‘रिसेप्शन’ला पसंती देण्याकडेही कल आहे.
मुली- मुलींच्या पसंतीपासून ते ‘बिदाई’पर्यंतच्या साऱ्याच रुढी-परंपरा आता मोडीत निघाल्या आहेत. लग्नसराईचा आता विशिष्ट कालावधीही राहिलेला नाही. सवडीनुसार मुहूर्त काढून लग्नकार्ये उरकले जातात.
पूर्वी गरीब असो की श्रीमंत मुलामुलींच्या लग्नात चूलबंद आवतणे देऊन गावपंगत द्यायचे. आता अवाढव्य खर्चाला फाटा देण्यासाठी गेटकेन विवाहाची पद्धती रुढ होऊ पाहत आहे. मोजक्या पाहुण्यांमध्येच लग्नकार्याचा कौतूक सोहळा उरकला जातो. त्यामुळे वधू- वर पित्यांचा वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय वऱ्हाडींसाठीही सोयीचे झाले आहे.
लग्नासारख्या मंगल व आनंदी सोहळ्यात प्रतिष्ठा व श्रीमंती मिरविणारे पैशांची अक्षरश: उधळपट्टी करतानाही पहावयास मिळतात. आधुनिकता व वेगळेपण जपण्यासाठी ‘रिसेप्शन’चे लोण ग्रामीण भागांमध्येही पोहोचले आहे. लग्न मोजक्या लोकांमध्ये व रिसेप्शनला आप्तेष्टांना निमंत्रित केले जाते.
विवाहसोहळ्याचा मुहूर्त, पत्रिका, स्टेजवरील सजावट, शामियाना, जेवणातील पदार्थ, कपडे, भांडी, बस्ता यात पर्याय उपलब्ध आहेत.
लग्नाच्या बदलत्या ‘ट्रेंड’बाबत पुरोहित आनंतराव कुलकर्णी म्हणाले, विवाह सोहळ्याचा मुहूर्त वधू- वर पक्षाच्या सोयीनुसार काढले जातात. ज्यांना झगमगाटात सोहळा करायचा आहे ते रात्रीचा मुहूर्त शोधतात तर वऱ्हाडींची गैरसोय होऊ नये याकरता काहीजण दुपारच्या मुहूर्तावरच लग्नकार्य उरकतात. पूर्वी हळदीसमारंभ चार दिवसांचा असायचा आता गेटकेन लग्नात सकाळी हळद अन् सायंकाळी लग्न असा झटपट कार्यक्रम असतो. नियमित लग्नकार्यात एक दिवसाचा हळदी समारंभ असतो, असे त्यांनी सांगितले.