लाच घेणाऱ्या वाहतूकपोलिसासह एकास अटक
By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:12:49+5:302014-09-08T00:35:35+5:30
वाळूज महानगर : धरलेल्या गाडीची कागदपत्रे परत देण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या ट्रॅफिक पोलिसासह एकस अटक केली.

लाच घेणाऱ्या वाहतूकपोलिसासह एकास अटक
वाळूज महानगर : धरलेल्या गाडीची कागदपत्रे परत देण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या ट्रॅफिक पोलिसासह एक ा जणास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज दुपारी रंगेहाथ अटक केली.
तक्रारदार दि.६ सप्टेंबर रोजी आपल्या मोटारसायकलवर वाळूज येथून औरंगाबादकडे एसबीआय बँकेत चलान भरण्यासाठी जात असताना वाहतूक पोलीस सुनील अंबादास चव्हाण (३३, रा. मिरजगावे नगरी, बीड बायपास) याने ए.एस. क्लबजवळ मोटारसायकल अडवून चावी काढून घेतली. त्यानंतर गाडीची मूळ कागदपत्रे व लायसन्स घेतले आणि पावती भरण्यास सांगितले. तक्रारदाराने पावती भरतो, तुम्ही गाडीची कागदपत्रे व लायसन्स द्या, अशी चव्हाण याच्याकडे मागणी केली असता चव्हाण याने १,१०० रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोड होऊन १ हजार देण्याचे ठरले. चव्हाण याने २०० रुपये रोख घेऊन बाकीचे ८०० रुपये दुसऱ्या दिवशी देण्यास सांगितले. तक्रारदाराने सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन लाच मागितल्याची तक्रार केली.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर येथील ओअॅसिस चौकात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ८०० रुपये देण्यासाठी ओअॅसिस चौक येथे आला. चव्हाण याने ही रक्कम त्याचा ‘पंटर’ नितेश भिकाजी खोतकर (२३, रा. साईनगर, पंढरपूर) याच्यामार्फत स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी.एम. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किशोर पवार, कर्मचारी सुधाकर मोहिते, श्रीराम नांदुरे, कैलास कामठे, सचिन शिंदे, अश्वलिंग होनसव व चालक इंगळे यांनी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.