पासपोर्टसाठी दीड महिन्यांची वेटिंग; हेलपाटे टाळण्यासाठी कागदपत्रांतील तफावत टाळा
By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 17:28 IST2023-07-29T17:27:48+5:302023-07-29T17:28:13+5:30
शनिवारी सुरू ठेवूनही दीड महिन्याची वेटिंग हटेना; स्कॅनर सुरू करण्याची अपेक्षा

पासपोर्टसाठी दीड महिन्यांची वेटिंग; हेलपाटे टाळण्यासाठी कागदपत्रांतील तफावत टाळा
छत्रपती संभाजीनगर : पासपोर्ट काढण्यासाठी आता स्वत:च ऑनलाईन अर्ज भरून मुलाखती देता येणे सोपे आहे. पण कागदपत्रात मूळ नावाला ‘भाऊ, राव, जी, बेन, बेगम’, अशी अधिकची बिरुदे लावणे महागात पडत आहे. त्यामुळे परत अर्ज करावा लागतो. गुजरातमध्ये तर अनेक अर्जदारांनी नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. म्हणून योग्य कागदपत्र जोडून चकरा टाळाव्यात, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
विदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने पासपोर्ट कार्यालयात गर्दी होते. २०१७ पासून सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे स्थानिक नागरिकांची पायपीट आणि आर्थिक बचत झाली. परंतु, काही तांत्रिक बाबीमुळे समस्या येतात. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना दीड महिन्यानंतर मुलाखतीचा संदेश मोबाईलवर येतो.
टी.सी.वर असलेल्या नावात बदल करून काहीजण पुढे विशेषणे लावतात. परंतु, त्याची तफावत पडताळणीत लक्षात आल्यावर अडचण होते किंवा पर्यायी कागदपत्रे दाखवावी लागतात. यात रहिवासी ओळखीचा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. या कार्यालयात स्कॅनर, प्रोसेसर अद्यापही बसविण्यात आले नसल्याने विलंबानेच पडताळणीचा नंबर लागतो.
हेलपाटे टाळण्यासाठी...
योग्य नामोल्लेख असलेली कागदपत्र दाखल केलेल्याच कॉपी कार्यालयात दाखल कराव्यात. तफावत असलेली कॉपी दाखल केल्यास अर्जदारास परत अर्ज करून पुढील तारीख घ्यावी लागते.
विलंब कमी होणार...
वाढती प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी येथेच डाॅक्युमेंट स्कॅन जर झाले, तर मुंबई कार्यालयास पाठवून प्रतीक्षा करीत बसण्यापेक्षा लवकरच पासपोर्ट अर्जदाराच्या हाती पडेल, अशी तयारी येथे सुरू आहे. शनिवारीदेखील कार्यालय सुरू असते. परंतु, वेटिंग लिस्ट कमी झालेली नाही. अर्ज लवकर निकाली काढण्यासाठी टेबल वाढविले जातील.
- प्रल्हाद पेंडणेकर, सर्व्हे अधिकारी, पासपोर्ट सेवा केंद्र