औरंगाबाद : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरातील रस्ते गुळगुळीत करणे, सौंदर्यीकरणासाठी मनपाकडून व्यापक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जळगाव रोडची पाहणी केली. विमानतळ ते हॉटेल ताज हा रस्ता गुळगुळीत करावा, असे निर्देश त्यांनी दिले. मात्र, हा रस्ता मनपाच्या अखत्यारित नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांची बैठक ६ डिसेंबर रोजी मनपाने आयोजित केली आहे.
फेब्रुवारी-२०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने काही विदेशी पाहुणे औरंगाबादेत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रशासक डॉ. चौधरी यांनी ताज हॉटेल ते विमानतळ या रस्त्यांची पाहणी केली. या मार्गांवरील मार्गावरील वाहतूक बेट, दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, रस्त्याच्या कडेला असलेली माती व मलबा उचलून घेणे, ग्रीन बेल्ट व फुटपाथ विकसित करून त्यांचे सौंदर्यीकरण करणे, सिडको उड्डाणपुलावर रोषणाई करणे, सिडको एन-१ चौकातील पिरॅमिड स्क्वेअरची रंगरंगोटी करणे, दिल्ली गेटची साफसफाई करणे आणि हॉटेल ताज ते विमानतळ या मार्गावरील अतिक्रमण काढून घेणे, अशा विविध सूचना प्रशासक डॉ. चौधरी यांनी दिल्या. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, एम. बी. काजी, डी. के. पंडित, उपायुक्त सोमनाथ जाधव, राहुल सूर्यवंशी, प्रभाग अभियंता फारूख खान, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांची उपस्थिती होती.
सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठकजी-२० परिषदेनिमित्त शहर सौंदर्यीकरणाची जबाबदारी एकट्या मनपाची नाही. विविध शासकीय कार्यालयांनीही त्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापारेषण आदी विभागांची एक बैठक मनपाकडून ६ डिसेंबर रोजी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध कामांची जबाबदारी वाटून देण्यात येईल.