Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 20:05 IST2021-12-01T20:04:40+5:302021-12-01T20:05:13+5:30
Omicron Variant : अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, म्यू आणि आता ‘ओमायक्राॅन’ अशा कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढते आहे.

Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच
औरंगाबाद : कोविड-१९ विषाणूच्या (Omicron Variant) जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) मराठवाड्यातही शक्य आहे. मात्र, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) परवानगी लांबल्याने घाटीत जनुकीय क्रमनिर्धारण अजूनही सुरू झालेले नाही. जनुकीय क्रमनिर्धारणासाठी घाटीतून महिन्याला १०० नमुने दिल्लीला पाठविण्यात येत आहेत.
विषाणू ठरावीक कालावधीनंतर स्वत:मध्ये बदल करतो, ही बाब गेली अनेक वर्षे फारशी गांभीर्याने घेण्यात आली नव्हती. मात्र, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, म्यू आणि आता ‘ओमायक्राॅन’ अशा कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढते आहे. औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (व्हीआरडीएल) नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी दिल्लीतील काऊंसिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि आयसीएमआर येथे पाठविण्यात येतात. तेथून अहवाल राज्याला मिळतो. डेल्टा प्लसने डोके वर काढल्यानंतर घाटी रुग्णालयाने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी प्रस्ताव दिला. त्यानंतर त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री मिळाली. परंतु, ‘आयसीएमआर’च्या परवानगीअभावी अजूनही जनुकीय क्रमनिर्धारण सुरू झालेले नाही.
परवानगी मिळताच सुरुवात
अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे म्हणाल्या, ‘आयसीएमआर’ची परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी आणि आवश्यक कीट मिळताच जनुकीय क्रमनिर्धारणास सुरुवात होईल. सध्या दिल्लीला महिन्याला १०० नमुने पाठविण्यात येतात..