अध्यक्ष निवडीवरून वृद्ध कलाकार वेठीस

By Admin | Updated: August 5, 2016 00:11 IST2016-08-05T00:05:20+5:302016-08-05T00:11:41+5:30

उस्मानाबाद : भाजप-सेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळातील वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गतची निवड समिती बरखास्त झाली.

Older Artists by Choosing Presidential Elections | अध्यक्ष निवडीवरून वृद्ध कलाकार वेठीस

अध्यक्ष निवडीवरून वृद्ध कलाकार वेठीस


उस्मानाबाद : भाजप-सेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळातील वृद्ध कलावंत मानधन योजनेअंतर्गतची निवड समिती बरखास्त झाली. त्यानंतर तातडीने नवीन समिती गठित होणे अपेक्षित होते. परंतु, तब्बल दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप अध्यक्ष निवड झालेली नाही. त्यामुळे सुमारे २६३ कलावंतांचे पात्र प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकाराबाबत वृद्ध कलावंतांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अख्खं आयुष्य कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती करण्यासाठी खर्ची घालणाऱ्या कलावंतांसाठी शासनाने वृद्ध कलाकार मानधन योजना सुरू केली. या माध्यमातून वृद्धापकाळत कलाकारांसाठी जगण्याचे एक साधन उपलब्ध झाले. त्यामुळे सदरील योजनेसाठी जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत गेला. परंतु, सुरूवातीच्या काळात या योजनेअंतर्गत दिले जाणारे मानधन अत्यंत तुटपुंजे होते. मानधनाची रक्कम वाढविण्यात यावी, यासाठी कलाकांरानी काही वर्ष पाठपुरवा केल्यानंतर मध्यंतरी शासनाने मानधनामध्ये वाढ केली. त्यानुसार आता कलाकारांना १ हजार ५००, १ हजार ८०० ते २ हजार १०० रूपये एवढे मानधन दिले जात आहे. मानधनाच्या रकमेत वाढ झाल्याने प्रस्तावांची संख्याही वाढू लागली. परंतु, हे प्रस्ताव तब्बल दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याला कारणही तसेच मजेशीर आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर भाजप-सेनेची सत्ता आली. त्यामुळे आघाडीच्या कार्यकाळातील लाभार्थी निवड समिती बरखास्त झाली. दरम्यान, सदरील कमिटी बरखास्त झाल्यानंतर नतून कमिटी तातडीने गठित होणे अपेक्षित आहे. पालकमंत्र्यांकडून जे नाव सुचविले जाते, त्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. परंतु, दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटत आला असतानाही पालकमंत्र्यांकडून सदरील नाव सूचविण्यात आलेले नाही. त्यामुळे आजपावेतो समिती अध्यक्षाची निवड झाली नाही. अध्यक्षाचे नाव निश्चित न होण्यामागेही तसेच कारण आहे. या समितीवर वर्णी लागावी, यासाठी सेनेसोबतच भाजपाचे पदाधिकारीही इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळेच अध्यक्ष पदासाठीच्या नावावर एकमत होत नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Older Artists by Choosing Presidential Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.