कायगावातील पुरातन मंदिरांना पुराचा वेढा
By Admin | Updated: August 4, 2016 23:58 IST2016-08-04T23:58:43+5:302016-08-04T23:58:59+5:30
कायगाव : नाशिकच्या धरणातून सोडलेल्या पाण्याने गोदावरीला पूर आला.

कायगावातील पुरातन मंदिरांना पुराचा वेढा
कायगाव : नाशिकच्या धरणातून सोडलेल्या पाण्याने गोदावरीला पूर आला. गोदापात्राने रौंद्र रूप धारण केल्याने जुने कायगाव परिसरातील जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली.
जुने कायगाव परिसरात रामेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर, घोटेश्वर, कायेश्वर, गोतमेश्वर आदी लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. यातील सर्वच मंदिरांना ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे. वर्षार्नुवर्षे जायकवाडी धरणाच्या संपादित क्षेत्रात असूनही आणि अनेकदा पुराच्या पाण्यात गेल्यानंतरही ही मंदिरे आपले अस्तित्व टिकवून आहे.
२००७ साली आलेल्या पुरांतर यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोदापात्रात पाणी वाहिले. त्यामुळे २००७ नंतर पहिल्यांदाच मुक्तेश्वर आणि घोटेश्वर ही दोन्ही मंदिरे पाण्यात गेली आहे.
रामेश्वर आणि सिद्धेश्वर ही दोन्ही मंदिरे उंच ठिकाणी असल्याने त्यांना पुराचा धोका जास्त प्रमाणात नाही. मात्र मुक्तेश्वर आणि घोटेश्वर हि दोन्ही मंदिरे ऐन नदीच्या प्रवाहा नजीक असल्याने बहुतांश वेळा पूर परिस्थितीत हि मंदिरे पाण्याखाली जातात.
धरण १०० टक्के भरले की ही दोन्ही मंदिरे किमान सहा महिने पाण्यातच असतात. मागील काही वर्षांत धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. त्यामुळे दोन्ही मंदिरे उघडीच होती.
महापुरातून वऱ्हाड निघालं 'रेस्क्यू' बोटीने
वैजापूर-कोणत्या वेळी कोणता प्रसंग उद्भवेल सांगता येत नाही. असेच काही प्रसंग वैजापूर तालुक्यातील नदी काठावर वसलेल्या १७ गावांतील नागरिकांनी गेल्या दोन दिवसात अनुभवले आहेत. सोमवार पासून गोदावरी नदी ओसंडून वाहत असल्याने वांजरगाव येथे असलेल्या सराला बेटावर २५० पेक्षा अधिक नागरिक अडकून पडले आहे. गुरुवारी प्रशासनाने एनडीआरएफच्या मदतीने सकाळ पासून ५७ जणांना सुरक्षित स्थळी हलविले . तर याच बेटावरील एका मुलीच्या लग्नाचे वऱ्हाड चक्क रेस्क्यू आॅपरेशच्या बोटीद्वारे घेवून जावे लागले. एवढ्या अडचणीवर मात करत हे लग्न ठरलेल्या वेळेत लावण्यात आले . मात्र रामगिरी महाराजांनी बेट न सोडण्याचा पवित्रा घेतल्याने इतर लोकही बेटावरच थांबल्याने प्रशासनाला मोठ्या अड़चणीला सामोरे जावे लागत आहे.
गोदामाईच्या पुरात अडकलेल्या सराला बेटावर महंत रामगिरी महाराजासह अडकलेल्या २५० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफच्या पथकने ‘रेस्क्यू आॅपरेशन’ला सुरुवात केली. रामगिरी महाराजांना बेटावरुन आणण्यासाठी स्वत: उपजिल्हधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोहर गव्हाड़ गेले , परंतु महाराजांनी बेट सोडून इतरत्र कुठेही जाणार नसल्याचे अधिकांऱ्यांना सांगितले . यामुळे बेटासह शिंदेवस्तीवरील नागरिकही बेटावरच थांबले. प्रशासनाने परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून सुरक्षित स्थळी चालण्यासाठी मनधरणी केल्यानंतर ५७ लोकांना बोटीद्वारे एनडीआरएफच्या जवानांनी वांजरगाव येथे आणले.
रात्री काही ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने विजेच्या तारा जमिनीवर पडल्या. पाण्याची पातळी वाढत असल्याने महावितरण कंपनीने नागमठाण फिडरवरील वैजापूर तालुक्यातील १० तर श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण, गोवर्धन, महांकाळ वाडगाव व सरला बेट असे १४ व लाडगाव फिडरवरील १० गावातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. पूर परिस्थिती ओसरल्यावर या भागातील वीज पुरवठा सुरुळीत होणार असल्याचे महावितरणच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.
पुरग्रस्तांना तातडीने धान्य वाटप-
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने त्या-त्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना गावातील सर्वच नागरिकांना रास्त दरात धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात १० पिण्याच्या पाण्याचे टॅकरही सुरु केले आहेत. पुरामुळे साथरोग पसरण्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.