अहो आश्चर्यम, डॉक्टरांविना दवाखाना !

By Admin | Updated: July 12, 2014 01:15 IST2014-07-12T00:16:47+5:302014-07-12T01:15:52+5:30

तामलवाडी : ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आणि अत्यल्प शुल्कामध्ये उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशानेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे चालविली जात आहेत.

Oh surprise, without a doctor's dispensary! | अहो आश्चर्यम, डॉक्टरांविना दवाखाना !

अहो आश्चर्यम, डॉक्टरांविना दवाखाना !

तामलवाडी : ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आणि अत्यल्प शुल्कामध्ये उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशानेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे चालविली जात आहेत. एकूण यंत्रणेवर महिन्याकाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च होत आहे. परंतु, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शुक्रवारचे चित्र पाहिल्यानंतर आरोग्य केंद्र सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत की, त्यांना वेदना देण्यासाठी? हा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. मागील दोन दिवसांपासून हा दवाखाना डॉक्टरांविना चालत आहे. केमवाडी येथील रुग्ण उपचारासाठी आला असता, त्याच्यावर उपचार होऊ न शकल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तर आरोग्य सेविका रुग्णास औषध, गोळ्या देऊन तात्पुरती मलमपट्टी करत होत्या.
संतोष मगर ल्ल तामलवाडी
सावरगाव येथील केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवायला कोणीच नव्हते. त्यामुळे कोण कामावर कोण गैरहजर याचा अंदाज येत नव्हता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता केमवाडी येथील रामचंद्र पंडित राऊत हे उपचारासाठी आरोग्य केंद्रात आले होते. जवळपास तासभर थांबल्यानंतर त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे डॉक्टर कधी येणार? अशी विचारणा केली. त्यावर ‘डॉक्टरच नाहीत’, असे बेधडक उत्तर दिले. ही माहिती कळताच रुग्णांसोबतच नातेवाईकही चांगलेच संतापले. काहीजणांनी रूग्णालयातच गोंधळ घातला. उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरून हजेरी पत्रकाची मागणी केली असता, सर्वच कर्मचारी हजर असल्याचे प्रयोगशाळा कर्मचारी एस.एम. पवार यांनी सांगितले. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत कानावर हात ठेवले. ओपीडी रुममध्ये आरोग्य सेविकाच रुग्णांवर उपचार करताना दिसून आल्या.
सदरील आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दवाखान्यात आरोग्य सेविका असून, त्या लसीकरणासाठी परगावी गेल्याचे सांगण्यात आले. तर ‘एनएनएम’ या उपचाराचा कक्ष सांभाळत होत्या. शुक्रवारी ८ पुरुष, ११ महिला, १० बालके असे २९ रूग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, एक ते दीड तास वाट पाहूनही डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे रामचंद्र राऊत या रूग्णास उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले.
कायमस्वरुपी डॉक्टर मिळणार कधी?
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कायमस्वरुपी वैैद्यकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे येथील पद्भार तालुका आरोग्य अधिकारी जी.पी. बिलापट्टे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. काटगावचे जी.डी. उपाध्ये यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, शुक्रवारी हे दोन्ही डॉक्टर दवाखान्यात उपस्थित नव्हते. त्यामुळे येथे आलेल्या रूग्णांना रिकाम्या खुर्च्या पाहूनच समाधान मानावे लागले.
सेवा सुधारणार कधी?
सर्वसामान्य रूग्णांना बसतोय फटका, पुढारी लक्ष देणार का?
जिल्हा परिषद सदस्य करणार उपोषण
डॉक्टरांची कायमस्वरुपी नियुक्ती व्हावी, यासाठी वारंवार मागणी केली. सावरगाव येथील अधिकाऱ्यांबाबत यापूर्वीही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. परंतु, सुस्त झालेल्या प्रशासनावर त्याचा काहीच फरक पडत नाही. असे असतानाच मागील दोन दिवसांपासून डॉक्टर नाहीत. त्यामुळे ‘एएनएम’च रूग्णांवर उपचार करीत असल्याचे ऐकल्यानंतर तर धक्काच बसला. हा रूग्णांच्या जिविताशी खेळण्यासारखा प्रकार असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने कायमस्वरूपी डॉक्टर द्यावेत, अन्यथा जि.प. समोर उपोषण करु, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या राजगौरी विक्रमसिंह देशमुख यांनी दिला आहे.
रूग्ण होताहेत हैैराण
सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास २२ गावांतील ३५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याचा भार आहे. असे असतानाही या आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सातत्याने कर्मचाऱ्यांची कमतरता असते. त्यामुळे येथे येणाऱ्या रूग्णांना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. ही परिस्थिती सुधारण्याची गरज प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली

Web Title: Oh surprise, without a doctor's dispensary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.