अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 18, 2025 12:06 IST2025-04-18T12:05:07+5:302025-04-18T12:06:13+5:30

मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

Oh my God! The price of Karadi oil, which is beneficial for heart health, has reached an all-time high. | अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

छत्रपती संभाजीनगर : करडीचे उत्पादन कमी आल्याने ऐन हंगामात भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. करडी तेलाने तर आजपर्यंतचे भाववाढीचे सर्व विक्रम मोडीत काढत चक्क २६० रुपये किलोचा दर गाठला आहे.

सर्व खाद्यतेलात सर्वाेत्तम, आरोग्यदायी तेल म्हणजे करडी तेल होय. मात्र, करडी बीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्याचा मोठा फटका तेल उत्पादनाला बसत आहे. मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

ग्राहकांनी हात आखडता घेतला
करडी बीचा हंगाम महाशिवरात्र ते गुढीपाडव्यापर्यंत असतो. यंदा उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाल्याने करडी बी ४५ रुपये किलोहून थेट ६६ रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. परिणामी, महिनाभरात २० रुपयांनी महागले आहे. करडी तेल आज २४० रुपये लिटर तर किलोमागे २० रुपये वाढ होऊन २६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांनी करडी तेल खरेदी करण्यात हात आखडता घेेणे सुरू केले आहे.

शहरात दररोज किती विकते करडी तेल
शहरात दररोज १००० ते १५०० लिटर करडी तेल विकले जाते. एकूण खाद्यतेल विक्रीत करडी तेलाची विक्री अवघे ५ ते १० टक्केच आहे.

किलो व लिटरमध्ये किती फरक
करडी तेल शहरात किलो व लिटर असे दोन वजनात विकल्या जाते. एक किलो म्हणजे १००० ग्रॅम व लिटरमध्ये ९०५ ते ९१० ग्रॅम होय. लिटरपेक्षा किलोमध्ये घेतले तर ९० ग्रॅम तेल जास्त मिळते.

करडी तेल २८० रुपये किलोपर्यंत महागण्याचा अंदाज
मागील वर्षी बड्या खाद्यतेल कंपन्यांकडे करडी तेलाचा साठा होता. हे खाद्यतेल फेब्रुवारीपर्यंत टिकले. पण आता बड्या खाद्यतेल कंपन्याकडे करडी बीचा साठा कमी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही महिन्यात करडी तेल २८० रुपये किलोपर्यंत तर लिटरमागे २६० रुपयांपर्यंत विकल्या जाईल.
- अशोक मिटकर, खाद्यतेल व्यापारी

शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेलाची विक्री वाढेल
करडी तेलाच्या भावाने उच्चांक गाठल्याने ग्राहकांनी १८० ते १९० रुपये लिटर विक्री होत असलेले शेंगदाणा तेल किंवा १४४ रुपये लिटर विक्री होत असलेले सूर्यफूल तेल खरेदी करणे पसंत केले आहे.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर
करडीच्या तेलात ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. जे मानवी शरीराला आवश्यक असलेले एक फायदेशीर फॅटी ॲसिड आहे. त्यात लिनोलिक ॲसिड असते. हे ॲसिड शरीरात कोलेस्ट्रेरॉलचे संतुलन राखण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही मदत करते.

Web Title: Oh my God! The price of Karadi oil, which is beneficial for heart health, has reached an all-time high.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.