शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: February 9, 2015 00:44 IST2015-02-09T00:39:34+5:302015-02-09T00:44:00+5:30
चिवरी : सैन्यदलात कर्तव्यावर असताना गतप्राण झालेले येवती (ता़तुळजापूर) येथील शहीद जवान संतोष हरिदास शिंदे (वय-२५ ) यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़

शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चिवरी : सैन्यदलात कर्तव्यावर असताना गतप्राण झालेले येवती (ता़तुळजापूर) येथील शहीद जवान संतोष हरिदास शिंदे (वय-२५ ) यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़
शिंदे हे मध्यप्रदेशातील जबलपूर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते़ शुक्रवारी सकाळी जबलपूर येथे झालेल्या अपघातात ते शहीद झाले होते़ त्यांचे पार्थिव जबलापूर येथून हेलिकॉप्टरने अहमदनगर येथे व तेथून रूग्णवाहिकेतून येवती येथे रविवारी सायंकाळी आणण्यात आले़ येवती येथील त्यांच्या घरासमोर त्यांना मानवंदना देण्यात आली़ तेथून स्मशानभूमीत पार्थिव नेल्यानंतर उपस्थित जवानांनी चार राऊंडची फायरिंग करून त्यांना सलामी दिली़ मयत संतोष शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे़ हरिदास शिंदे यांचा एकुलता एक मुलगा शहीद झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे़ शहीद जवानाच्या अंत्यविधीस माजी आ़ नरेंद्र बोरगावकर, माजी जि.प. अध्यक्ष शिवदास कांबळे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे एम़वाय़डांगे, सरपंच दत्ता बनसोडे यांच्यासह गावासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
दरम्यान, शहीद जवान संतोष शिंदे यांच्या अंत्यविधीस लोकप्रतिनिधींसह तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
जवान संतोष शिंदे यांचा खोताचीवाडी येथील एका मुलीसोबत विवाह ठरला होता़ घरच्या मंडळींनी ११ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित केली होती़ विशेष म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी हुंड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाची जय्यत तयारीही करण्यात येत होती़ मात्र, अचानक काळाने घाला घातल्याने संतोष शिंदे हे शहीद झाले़ ज्या दिवशी हुंड्याचा कार्यक्रम होणार होता त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमधूनही हळहळ व्यक्त होत होती़