अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By Admin | Updated: January 14, 2016 23:24 IST2016-01-14T23:18:28+5:302016-01-14T23:24:52+5:30

परभणी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे इतर कर्मचारी ऐकत नसतील तर ही चिंतेची बाब असून, कामचुकार कर्मचाऱ्यावर धाक असला पाहिजे़

The officers took control | अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

परभणी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे इतर कर्मचारी ऐकत नसतील तर ही चिंतेची बाब असून, कामचुकार कर्मचाऱ्यावर धाक असला पाहिजे़ तसेच येथील जि़प़चे कामकाज ढेपाळले असून, कामामध्ये सुसूत्रता आणावी, असा सज्जड दम आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिला़
येथील जिल्हा परिषदेच्या कै़ बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहामध्ये वार्षिक तपासणी अहवालाचे आयुक्त उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत वाचन करण्यात आले़ यावेळी अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, विभागीय उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे आदींची उपस्थिती होती़ जिल्हा परिषदेच्या वार्षिक तपासणी अहवालाचे यावेळी वाचन करण्यात आले़ यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, परभणी हा जिल्हा सुजलाम्, सुफलाम् होता़ परंतु, दिवसेंदिवस येथून मजुरांचे स्थलांतर होत आहेत़ हवामानाचा बदलता परिणामही जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ त्यामुळेच यावर्षी पहिल्यांदाच ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे़ शासनाने जिल्हा परिषद सक्षम करण्यावर भर दिला असून, ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामे राबविली जात आहेत़ परंतु, काही अधिकाऱ्यांनी रोहयोसारख्या योजनचा सोयीनुसार अर्थ लावल्याने अनेक ठिकाणी अनियमितता झाल्या. येथील प्रतिनियुक्त्यांमध्ये निष्काळजीपणा झाला असून, आवडीच्या जागा अडवून ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तुम्ही का कारवाई करीत नाही, असा दम यावेळी दांगट यांनी दिला़ काही विभागातील बिंदू नामावली आतापर्यंत तयार केली नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले़ येथील विविध विभागातील पदोन्नत्याही रखडल्या असून, डिसेंबर अखेर पदोन्नत्या करण्याचे आदेश असताना पदोन्नत्या का रखडल्या असा सवाल त्यांनी केला. यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत़(प्रतिनिधी)

Web Title: The officers took control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.