महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीला अधिकार्यांच्या दांड्या
By Admin | Updated: May 11, 2014 00:11 IST2014-05-11T00:06:07+5:302014-05-11T00:11:32+5:30
औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी शुक्रवारी बजेटसंदर्भात बोलाविलेल्या बैठकीला अधिकार्यांनीच दांड्या मारल्या.

महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीला अधिकार्यांच्या दांड्या
औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी शुक्रवारी बजेटसंदर्भात बोलाविलेल्या बैठकीला अधिकार्यांनीच दांड्या मारल्या. ३ वाजता बैठक लावण्यात आली होती. तासभर वाट पाहूनही बैठकीला लेखा विभागातील अधिकार्यांनी हजेरी लावली नाही. नगर सचिव प्रमोद खोब्रागडे यांची बैठकीला उपस्थिती होती. पदाधिकार्यांमध्ये गटनेते गजानन बारवाल, मीर हिदायत अली, अफसरखान, नगरसेवक गिरजाराम हाळनोर, मोहन मेघावाले, किशोर नागरे यांची उपस्थिती होती. इतर पदाधिकार्यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेने पाणी फेरले गेल्याने ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केलेली सभा वंदेमातरम् गीत घेऊन आचारसंहिता संपेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. ती बैठक २० मे रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता नियमित सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. भाजपा आणि सेनेमध्ये बजेटवरून वाद आहेत. प्रशासनाने दिलेल्या ५४९ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ११३ कोटी रुपयांची वाढ केली. त्यामुळे सर्वसाधारण सभेत त्यात वाढ करण्यासाठी आता काहीही राहिले नसले तरी सभेमध्ये चर्चेअंती निर्णय घेण्याची तयारी महापौरांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने वर्ष २०१४-१५ साठी ५४९ कोटी ११ लाख रुपयांचे बजेट सादर केले. ३१ मार्च २०१५ पर्यंत सर्व महत्त्वाचे खर्च करून पालिकेच्या तिजोरीत १९ लाख रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज बजेटमध्ये होता. वास्तववादी आणि कुठल्याही विकासकामांना थारा नसलेले हे बजेट २२५ कोटी रुपयांच्या शिल्लक कामांवर गदा आणणारे आहे, तर नवीन कामे जरी त्यात बळजबरीने घुसडली तरीही ती कामे पूर्ण होण्याची काहीही शाश्वती देता येणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले. हे मनपाचे शेवटचे बजेट आहे. पुढच्या वर्षी मनपाच्या निवडणुका असल्यामुळे फेबु्रवारी २०१५ मध्ये फक्त लेखानुदान समोर येईल.