जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची ससेहोलपट !
By Admin | Updated: December 15, 2014 00:44 IST2014-12-15T00:35:19+5:302014-12-15T00:44:24+5:30
लातूर : वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालय हस्तांतर झाल्यापासून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची ससेहोलपट आहे

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची ससेहोलपट !
लातूर : वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालय हस्तांतर झाल्यापासून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची ससेहोलपट आहे. कधी गांधी चौकातील जि.प. कन्या शाळेच्या जागेत, तर कधी आरोग्य उपसंचालकांच्या जागेतील कार्यालयातून कारभार. आता पुन्हा प्रशासकीय इमारतीच्या हिवताप कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे.
अडीच महिन्यांपूर्वीच स्थलांतरीत करुन गांधी चौक येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या इमारतीत येवून स्थिरावले होते़ जिल्हा शल्यचिकित्सकांना पुन्हा हे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या हिवताप विभागाच्या कार्यालयात स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत़ या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक आपले कार्यालयाचे स्थलांतर लवकरच करणार आहेत़
लातूर जिल्हा रुग्णालयाचे २००७ साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात विलीन करण्यात आले़ तेव्हा जिल्हा रुग्णालयाच्या चल-अचल संपत्तीसह या जिल्हा रुग्णालयाचे हास्तांतरण करण्यात आले़ तेव्हापासून या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास मिळेल तेथील जागेत कार्यालय फिरत आहे. आजतागायत या कार्यालयाची भटकंती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाच्या अपघात विभागात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सुरु होते़ विलिनीकरणानंतर कार्यालय गांधी चौकातील तत्कालीन जि.प. कन्या शाळेच्या जागेत नर्सिंग महाविद्यालयाच्या जागेत स्थलांतरीत झाले होते.
मागच्या अडीच महिन्यांपूर्वी गांधी चौक येथील आरोग्य उपसंचालक कार्यालय आरोग्य भवन येथे स्थलांतरीत झाल्याने ही जागा रिकामी होती़ या जागेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपले कार्यालय थाटले होते. परंतु, या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याने ही जागाही रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी हिवताप विभागाचा सहारा घेतला आहे.