नायलाॅन मांजाने कुणाचा गळा, तर कुणाचे नाक, बोट कापले; शिक्षकाच्या ओठाला पडले ८ टाके

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:29 PM2024-01-16T15:29:19+5:302024-01-16T15:29:30+5:30

अनेक जण जखमी, घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत उपचार

Nylon manja cut someone's throat, someone's nose, finger; The teacher got 8 stitches on his lip | नायलाॅन मांजाने कुणाचा गळा, तर कुणाचे नाक, बोट कापले; शिक्षकाच्या ओठाला पडले ८ टाके

नायलाॅन मांजाने कुणाचा गळा, तर कुणाचे नाक, बोट कापले; शिक्षकाच्या ओठाला पडले ८ टाके

छत्रपती संभाजीनगर : ऐन संक्रांतीच्या दिवशीही नायलाॅन मांजामुळे कुणाचा गळा, कुणाचे नाक, तर कोणाचे बोट कापल्याची घटना घडल्या. नायलाॅन मांजा वापरू नका, अशी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या एका शिक्षकाचे ओठ नायलाॅन मांजाने कापल्या गेले. या शिक्षकाच्या ओठाला ८ टाके पडले.

घाटी रुग्णालयात दिवसभरात ७ जणांवर उपचार करण्यात आले. यात तिघांना मांजामुळे जखम झाली होती. त्यांच्या जखमांवर टाके देण्यात आले. एका महिलेच्या भुवईवर पतंगामुळे जखम झाली. तर तिघे जण पतगांमुळे खाली पडून जखमी झाले. कुणालाही उपचारासाठी भरती करावे लागले नाही, असे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.

सैनिकी शाळेमध्ये शिक्षक असलेले प्रवीण खरे (रा. चिकलठाणा) हे रविवारी सायंकाळी चिकलठाणा विमानतळासमोरून दुचाकीवरून जात होते. अचानक गळ्याला मांजा अडकला. त्यांनी तो हटविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांच्या ओठाचा काही भाग कापला गेला. त्यांनी तातडीने एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली.

घाटीत आलेल्या कुणाला किती जखम?
- मोहम्मद माझ (१६, रा. जुना बाजार) या तरुणाच्या गळ्याला ६ से.मी. लांबीची जखम झाली. ही जखम एक सें.मी. पेक्षा कमी खोल होती. जखमेवर टाके देण्यात आले.
- समर्थ राजपूत (१४) या मुलाच्या हाताला ३ से.मी.ची जखम झाली. त्यालाही टाके देण्यात आले.
- रहमत पाशा (३०, रा. रशीदपुरा) यांच्या नाकाला ३ सें.मी. आणि भुवईवर २ सें.मी.ची जखम झाली. नाकावरील जखमेला टाके द्यावे लागले.
- शाहीन शेख (२२, रेंगटीपुरा) यांच्या भुवईच्या वर पतंगामुळे जखम झाली.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, पण...
नायलाॅन मांजा वापरू नका, असे विद्यार्थ्यांना सांगत आलो आहे. या नायलाॅन मांजामुळे किती गंभीर दुखापत होऊ शकते, याचा मलाच अनुभव आला. ओठाला ८ टाके पडले. बोलताना प्रचंड त्रास होत आहे.
- प्रवीण खरे, शिक्षक

चिमुकली बचावली, दुचाकीचालकाचे बोट कापले
पुंडलिकनगरमधून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक एक पतंग खाली येऊन मांजा दुचाकीवर मागे बसलेल्या आईच्या मांडीवरील चिमुकलीच्या गळ्यावर आला. मात्र, प्रसंगावधान राखत दुचाकीचालकाने एका हाताने मांजा वरच्या वर पकडला. यात चिमुकली बचावली. मात्र, दुचाकी चालकाच्या हाताचे बोट कापले गेले. प्रशांत मगरे म्हणाले, नायलाॅन मांजाच्या बंदीची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.

Web Title: Nylon manja cut someone's throat, someone's nose, finger; The teacher got 8 stitches on his lip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.