परिचारिकांची सेवा दृष्टीआडच ?
By Admin | Updated: May 12, 2014 04:27 IST2014-05-11T23:06:07+5:302014-05-12T04:27:01+5:30
रक्ताचे नाते नाही. कुठल्याही नात्याचा संबंध नाही, अशा स्थितीत आजारपणाच्या काळात रुग्णांची काळजी घेणार्या परिचारिकांना ना मनासारखा पगार मिळतो, ना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.

परिचारिकांची सेवा दृष्टीआडच ?
गजानन दिवाण, औरंगाबाद
रक्ताचे नाते नाही. कुठल्याही नात्याचा संबंध नाही, अशा स्थितीत आजारपणाच्या काळात रुग्णांची काळजी घेणार्या परिचारिकांना ना मनासारखा पगार मिळतो, ना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कामाचे तासही नावालाच. घरातील अडीअडचणींना घरीच सोडून रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या या परिचारिकांचे कोणाकडून साधे कौतुकही होत नाही. साधारण तीन रुग्णांसाठी एक परिचारिका असावी, असे महाराष्टÑ परिचारिका परिषदेचा नियम सांगतो. मात्र, मराठवाड्यातील जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयांत तो पाळला जात नाही. काही जिल्हा रुग्णालयांत तर अख्खा वॉर्ड एकाच परिचारिकेला सांभाळावा लागतो. इंग्लंडमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ अँड केअर एक्सेलन्सने गेल्या सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रात एका परिचारिकेकडे आठपेक्षा जास्त रुग्ण असल्यास ती धोक्याची स्थिती असते, असे म्हटले आहे. तो नियम येथे लावल्यास शासकीय रुग्णालयांतील जवळपास सर्वच रुग्ण धोक्यात असल्याचा निष्कर्ष निघतो. मात्र, आपल्याकडे मोठा अनर्थ घडत नाही. याचे श्रेय रुग्णांची सेवा करणार्या परिचारिकांना जाते, अशी प्रतिक्रिया महाराष्टÑ परिचारिका परिषेदेच्या कार्याध्यक्षा इंदूमती थोरात यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. मराठवाड्यात केवळ २५ टक्के परिचारिका जालना जिल्हा रुग्णालयात ११७ परिचारिका आहेत. नांदेडमध्ये त्यांची तब्बल २२७ पदे रिक्त आहेत. लातुरात ३१८ पदे मंजूर असताना २६९ भरण्यात आली आहेत. औरंगाबादेतील घाटी या सर्वांत मोठ्या शासकीय रुग्णालयात जवळपास १०० पदे रिक्त आहेत. ही झाली मंजूर पदांची संख्या. मुळात तीन रुग्णांसाठी एक परिचारिका या नियमानुसार पदेच मंजूर नसल्याची माहिती महाराष्टÑ परिचारिका परिषेदेच्या कार्याध्यक्षा इंदूमती थोरात यांनी दिली. या नियमानुसार साधारण २५ टक्के परिचारिकांवरच शासकीय रुग्णालयांचा कारभार चालतो.