सालगड्यांची संख्या घटली
By Admin | Updated: March 19, 2015 23:56 IST2015-03-19T23:37:13+5:302015-03-19T23:56:25+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड पूर्वी पाडव्याला शेतकऱ्यांकडे काम करत असलेल्या सालगड्याचा हिशोब व्हायचा, आता काम देता का, असे म्हणत सालगडी शेतकऱ्यांकडे विचारत यायचे

सालगड्यांची संख्या घटली
व्यंकटेश वैष्णव , बीड
पूर्वी पाडव्याला शेतकऱ्यांकडे काम करत असलेल्या सालगड्याचा हिशोब व्हायचा, आता काम देता का, असे म्हणत सालगडी शेतकऱ्यांकडे विचारत यायचे, मात्र आता सालगड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली असल्याने नविन वर्षात शेतकऱ्यांना मजूरांची मोठी टंचाई जाणवत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.
कृषी उद्योगासाठी मजूरांची मोठी टंचाई शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांकडे पाणी असूनही उपयोग होत नाही. कारण राबणारे हातच नसतील तर उत्पन्न घेणार कसे? असा प्रश्न आता बहूभूधारक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला असल्याचे चित्र बीड जिल्हयात गुरूवारी पहावयास मिळाले. शहरात चांगली मजूरी मिळते मग शेत मालकाच्या ताबेदारीत कशाला राबायचे असा, प्रति प्रश्न गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरातील मजूर सखाराम बडे यांनी केला आहे.
परराज्यातून मागविले जातात मजूर
परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात मजूर बीड जिल्ह्यात आयात केले जातात. याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र ही संख्या पन्नास हजाराच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. परराज्यातून आणलेल्या मजूराला पाच ते सहा हजार रूपये प्रति महिना दिला जात असल्याचे शेतकरी बाबासाहेब वडमारे यांनी सांगितले.
महिन्यावारी काम करण्याला
मजूरांची पसंती
शेतकऱ्यांकडे वर्षभरासाठी बांधील रहाण्यापेक्षा महिन्यावारी रहाणाऱ्या मजूरांची संख्या जास्त आहे. दहा पैकी आठ मजूर महिन्यावारीच काम करतात. विशेष म्हणजे महिन्यावारी कामाला रहाताना शेतकऱ्यांना उचल द्यावी लागते.
गुढीपाडव्याला बळीराजाचे नवीन वर्ष सुरू होते. पाडव्या पर्यंत खळे संपते. गतवर्षीचा सालगड्याचा हिशोब करून नव्याने उचल देण्याची पध्दत आहे, परंतु गतवर्षी कामावर असलेला सालगडी नविन वर्षात कामावर राहील की, नाही याची शास्वती देता येत नाही. दहा सालगड्यातून केवळ दोनच सालगडी एकाच मालकाकडे पाच ते सहा वर्ष राहातात. तीन -चार वर्षापासून सालगड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. यंदा ६० ते ६५ हजार रूपये साल (प्रतीवर्षाला) देऊनही सालकरी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातून सहा लाखापेक्षा जास्त मजूर उसतोडणीच्या कामासाठी बाहेर जिल्ह्यात व राज्यात जातात. गावावर मजूरी करायची म्हटल्यावर एकहाती रक्कम मिळत नाही. यापेक्षा एकदाच मोठी रक्कम घ्यायची व उसतोडणीला जायचे. हा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड, वडवणी, माजलगाव, गेवराई यासह सर्व तालुक्यात पहावयास मिळतो.