गरोदर मातांसाठी आता मदर डे केअर सेंटर

By Admin | Updated: May 22, 2014 00:12 IST2014-05-21T23:56:54+5:302014-05-22T00:12:20+5:30

लातूर : गरोदरमाता मृत्यूदर आणि कुपोषण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग सरसावला आहे.

Now Mother's Day Care Center for Pregnant Mothers | गरोदर मातांसाठी आता मदर डे केअर सेंटर

गरोदर मातांसाठी आता मदर डे केअर सेंटर

 लातूर : गरोदरमाता मृत्यूदर आणि कुपोषण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग सरसावला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांत ‘मदर डे केअर सेंटर’ होणार असून, प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर लातूर तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ४६ आरोग्य केंद्रांत टप्प्या-टप्प्याने हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. बाळंतपणापूर्वी उपचार आणि आहार गरोदरमातांना या केंद्रातून दिला जाईल. लातूर जिल्हा कुपोषणमुक्तीमध्ये महाराष्ट्रात तिसर्‍या स्थानावर व मराठवाड्यात प्रथम स्थानावर आहे. राज्यात प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही विभागाने आता संयुक्त प्रयत्न सुरू केले आहेत. कुपोषणाच्या विविध कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कमी वजनाची मुले जन्मालाच येऊ नयेत, त्यासाठी या उपक्रमात गरोदरमातांची दक्षता घेतली जाणार आहे. गरोदरपणात मातेचे वजन वाढविणे, त्यांना लोहयुक्त गोळ्या देणे, मातेची एचबी १३ पेक्षा कमी होऊ नये, लसीकरण (टीटी) वेळेवर करणे, सूक्ष्म पोषण तत्त्वांनीयुक्त एकवेळ अतिरिक्त पोेषण आहार देणे या बाबींची दक्षता मदर डे केअर सेंटरमध्ये घेतली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभाग गरोदर मातांना कडधान्य, प्रोटिनयुक्त आहार पुरविणार आहे. तर आरोग्य विभाग बाळंतपण होईपर्यंत उपचाराची सर्व जबाबदारी घेणार आहे. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस या गावांतील गरोदरमातांच्या नोंदी करणार आहेत. त्यानंतर गरोदर मातांना प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्रात उपचार केले जातील. तेथेच त्यांना सकस आहार दिला जाईल. तर वैद्यकीय अधिकारी आरोग्य तपासणी व मोफत गोळ्या पुरवितील. यामुळे कमी वजनाचे बालक जन्माला येणार नाही. परिणामी, लातूर जिल्हा कुपोषणमुक्तीत अग्रस्थानी राहील, असे नियोजन आरोग्य व बालकल्याण विभागाने केले आहे. पहिल्या टप्प्यात लातूर तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभही चिंचोली (ब.) या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शेळके यांनी दिली. (प्रतिनिधी) गरोदर माता मृत्यूचे प्रमाणही लातूर जिल्ह्यात कमी आहे. परंतु, हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात वेळ मिळेल तसा गरोदर मातांना आणले जाईल. तेथे तपासणी व उपचार केल्यानंतर सकस आहार दिला जाईल. जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, आरोग्य सभापती कल्याण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कागणे आदी योजनेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Now Mother's Day Care Center for Pregnant Mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.