हवेतील प्रदूषणावर आता राहणार नजर

By Admin | Updated: June 3, 2016 23:44 IST2016-06-03T23:33:32+5:302016-06-03T23:44:35+5:30

औरंगाबाद : शहराची हवा कितपत शुद्ध आहे, हवेत कोणकोणते घातक घटक पसरले आहेत,

Now look at the air pollution | हवेतील प्रदूषणावर आता राहणार नजर

हवेतील प्रदूषणावर आता राहणार नजर

औरंगाबाद : शहराची हवा कितपत शुद्ध आहे, हवेत कोणकोणते घातक घटक पसरले आहेत, औद्योगिक वसाहतींमधील कोणती कंपनी वातावरण प्रदूषित करीत आहे, यावर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची 24/7 नजर राहणार आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यासाठी ८० लाख रुपये खर्च करून हवेची गुणवत्ता मोजणी करणारे केंद्र उभारण्यात आले आहे.
वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या जागेत हे केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे मराठवाड्यातील हे पहिलेच केंद्र आहे. मुंबईतील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी हे केंद्र थेट जोडण्यात आले आहे. अशा प्रकारे औरंगाबादेतील प्रदूषणावर थेट दिल्ली व मुंबईचा ‘वॉच’ राहणार आहे.
२० कि. मी. कार्यक्षेत्र
वाऱ्याच्या वेगावर केंद्राचे कार्य अवलंबून आहे. वाऱ्याचा वेग जेवढा जास्त, तेवढ्या अधिक परिसराला या केंद्राचा फायदा होतो. शहरात साधारणत: १२ ते १५ कि. मी. प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहत असतात. वाऱ्याचा वेग ताशी २० कि. मी. एवढा असल्यास २० कि. मी. परिघातील प्रदूषण मोजता येते.
असा होईल फायदा
वातावरणात प्रदूषण पसरविणारे रासायनिक उद्योग कोणते आहेत, याचा उलगडा या केंद्रामुळे होणार आहे. या केंद्रावरील नोंदीमुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी तीन कंपन्यांवर कारवाई केली होती.
धूलिकणांचे प्रमाण जास्त
औरंगाबादच्या हवेत धूलिकण वगळता इतर घातक घटक नसल्याचे या केंद्रावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. केंद्रामध्ये होणाऱ्या नोंदीचा अभ्यास करून प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
- डी. बी. पाटील, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
या छोटेखानी केंद्राच्या छतावर हवेतील प्रदूषण मोजणारी विविध यंत्रे बसविण्यात आली आहेत. केंद्रातील नऊ अत्याधुनिक मॉनिटरला ती जोडली आहेत. हवेतील घटकाची नोंद या मॉनिटरवर सतत होत असते. नायट्रिक आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड, धूलिकण, भूगर्भावरील ओझोन थर, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, अमोनिया, बेनझीन यांचे हवेतील प्रमाण केंद्रात नोंदविले जाते. एवढेच नव्हे, तर बाहेर बसविण्यात आलेल्या ‘स्क्रीन’वर ही आकडेवारी प्रदर्शित केली जाते. याशिवाय वाऱ्याचा वेग व दिशा, सूर्याचे उत्सर्जन, तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान यांच्या नोंदी घेण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे, असे केंद्र संचालक प्रवीण सिंह यांनी सांगितले.

Web Title: Now look at the air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.