आता लोडशेडिंगचे चटके
By Admin | Updated: May 20, 2016 00:39 IST2016-05-20T00:35:32+5:302016-05-20T00:39:36+5:30
औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

आता लोडशेडिंगचे चटके
औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात पाच तासांपासून तब्बल नऊ तासांपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हात नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. औरंगाबाद शहर मात्र, लोडशेडिंगमुक्त घोषित झालेले असल्यामुळे येथील वीजपुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपासून जिल्ह्यात लोडशेडिंग पूर्णपणे बंद झालेली होती. महावितरणकडे मागणीपेक्षाही जास्त वीज उपलब्ध होती. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा अपवाद वगळता कुठेही वीजपुरवठा खंडित होत नव्हता. मात्र दोन-तीन दिवसांतच या परिस्थितीत बदल झाला आहे. काही ऊर्जा निर्मिती केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे विजेची उपलब्धता कमी झाली असून, ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून दोन तीन दिवसांपासून ग्रामीण भागात लोडशेडिंग घेण्यात येत आहे. महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, महावितरण कंपनीकडे सध्या पुरेशी वीज उपलब्ध नाही. रोजची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. म्हणून ही तूट भरून काढण्यासाठी लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाते. ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण जास्त आहे, तिथे जास्त प्रमाणावर लोडशेडिंग घेण्यात येत आहे. साधारणत: ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे अधिक वेळ लोडशेडिंग होत आहे. औरंगाबाद शहरात मात्र, अद्याप लोडशेडिंग लागू झालेली नाही. शासनाने राज्यातील महसुली मुख्यालयाची ठिकाणे याआधीच लोडशेडिंगमुक्त घोषित केलेली आहेत. त्यामुळे तूर्तास तरी अखंडितच पुरवठा राहील, असेही सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ३७ लाख इतकी आहे. त्यापैकी सुमारे २० लाख लोक हे ग्रामीण भागात राहतात. या २० लाख लोकसंख्येला सध्या लोडशेडिंगचे चटके बसत आहेत. उन्हाचा कहर कायम तापमान : ४३.४ अंश औरंगाबाद : शहरात गुरुवारीदेखील उन्हाचा कहर कायम राहिला. सूर्यकिरणांची प्रखरता वाढल्यामुळे दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते. वाहतूकही रोडावली होती. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी ४३.४ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हे तापमान ०.४ अंश सेल्शिअसने कमी होते, पण तरीदेखील हे तापमान सामान्य तापमानापेक्षा किती तरी जास्त असल्यामुळे उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत होता. त्यात किमान तापमान वाढून ते ३०.४ अंश सेल्शिअसवर पोहोचले होते. त्यामुळे वातावरणातील शुष्कपणा वाढला होता. परिणामी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. दुपारच्या वेळी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे भासत होते. या सर्वाचा परिणाम कामकाजावरही जाणवला. दुपारनंतर लोकांनी बाहेर पडणे टाळले. त्यामुळे अनेक रस्ते ओस पडले होते. सायंकाळनंतर मात्र वातावरणात काहीसा बदल दिसून आला.