आता गव्हात भाववाढीचा उच्चांक
By Admin | Updated: November 5, 2016 01:35 IST2016-11-05T01:20:01+5:302016-11-05T01:35:47+5:30
औरंगाबाद : हरभरा डाळीपाठोपाठ आता गव्हाने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी भाववाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आता गव्हात भाववाढीचा उच्चांक
औरंगाबाद : हरभरा डाळीपाठोपाठ आता गव्हाने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी भाववाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाजारात २३५० ते ३५०० रुपये क्विंटलने गहू विकत आहे. येत्या १५ दिवसांत आणखी भाववाढीची शक्यताही वर्तविली जात आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने रबी हंगामात गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्रातही मागील ५ वर्षांनंतर यंदा गव्हाचा पेरा वाढणार आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथील बीज तयार करणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तसेच गव्हाच्या तेजीला आणखी एक कारण सांगितल्या जात आहे की, इंदोर येथील केंद्र सरकारच्या गोदामातील गव्हाचे टेंडर निघाले आहे. यात १८०० ते १८५० रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या गव्हाच्या टेंडरला नुकताच २०५० ते २०७५ रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. मिलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात हा गहू खरेदी केला आहे. याचा खुल्या बाजारातील गव्हाच्या किमतीवर झाला. मागील ५ दिवसांत गव्हाचे भाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी वधारले. २०५० ते २४०० रुपये क्विंटलने विक्री होणार नर्मदा गहू शुक्रवारी २३५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तसेच १४७ व ४९६ या जातीचे गहू २५०० रुपये प्रतिक्विंटल तर शरबती गहू २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. औरंगाबादेत सर्वात उंच भावात शरबती गहू विक्री होतो. एरव्ही सर्वात महाग ३२०० रुपयांपर्यंत हा गहू विकल्या जात असे, पण शहरात पहिल्यांदाच शरबती गहू सध्या ३५०० रुपयांपर्यंत विकल्या जात असल्याची माहिती गव्हाचे होलसेल विक्रेते व कृउबाचे संचालक प्रशांत सोकिया यांनी दिली. सध्या गव्हाची पेरणी सुरू असून, फेब्रुवारीपासून नवीन गहू बाजारात येण्यास सुरुवात होईल. पेरणी क्षेत्र वाढल्याने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब या राज्यांतही गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल व भाव कमी होतील, असा होराही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
८० टक्के बाजरी काळसर
बाजारात येणाऱ्या बाजरीपैकी ८० टक्के बाजरी काळसर पडली आहे. त्यामुळे दर्जेदार बाजरीचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, बाजरीच्या भावातही क्विंटलमागे ३०० रुपये भाववाढ झाली आहे. दर्जेदार बाजरी १७०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री होत आहे. हिवाळ्यात बाजरीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.