आता हज यात्रेकरू हरवणार नाहीत! महाराष्ट्रातील २१ हजार भाविकांच्या मनगटावर 'स्मार्ट वॉच'
By मुजीब देवणीकर | Updated: December 11, 2025 19:05 IST2025-12-11T19:05:24+5:302025-12-11T19:05:54+5:30
जीपीएस ट्रॅकिंगमुळे गर्दीतही शोध घेणे सोपे; यात्रेकरूला काही मदत हवी असेल तर फक्त विशेष बटण दाबा

आता हज यात्रेकरू हरवणार नाहीत! महाराष्ट्रातील २१ हजार भाविकांच्या मनगटावर 'स्मार्ट वॉच'
छत्रपती संभाजीनगर : पवित्र हज यात्रेला यंदा महाराष्ट्रातून किमान २१ हजार हज यात्रेकरू जाणार आहेत. यंदा प्रत्येक हज यात्रेकरूच्या मनगटावर ‘स्मार्ट वॉच’ राहणार आहे. यामध्ये जीपीएस ट्रॅकिंग, सीम कार्ड इ. अत्याधुनिक सोयीसुविधा असतील. हज यात्रेकरू गर्दीत कुठे हरवला तर त्याला शोधणे अत्यंत सोपे जाईल. यात्रेकरूला काही मदत हवी असेल तर त्यात विशेष बटणसुद्धा देण्यात येणार आहे.
हज यात्रा २०२६ साठी केंद्रीय हज कमिटीने तीन महिन्यांपूर्वीच ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू केली. यंदा भारतातील १ लाख ७५ हजार यात्रेकरू हजला जातील. त्या दृष्टीने हज कमिटीने विविध सुविधांवर भर देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातून २१ हजारांवर यात्रेकरू जातील. प्रतीक्षा यादीत सुरुवातीला १७ हजार ५०० यात्रेकरू होते. ‘वेटिंग लिस्ट’ हळूहळू कमी होत असून, आता फक्त ८ हजार यात्रेकरू प्रतीक्षेत आहेत. सौदी अरेबिया सरकार दरवर्षी यात्रेकरूंच्या सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. यंदा भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय हज समितीने मोठा निर्णय घेतला. प्रत्येक यात्रेकरूच्या मनगटावर हे घड्याळ देण्यात येईल. त्यासाठी कमिटीने निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात केली. घड्याळाचा खर्च यात्रेकरूंना द्यावा लागेल किंवा हज कमिटी मोफत देणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
हज यात्रेच्या दरम्यान जगभरातील यात्रेकरू येतात. गर्दीत अनेक भारतीय यात्रेकरू हरवतात. त्यांना रस्ता सापडत नाही. त्यामुळे त्यांना शोधणे थोडे अवघड जाते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी स्मार्ट वॉच प्रभावशाली राहील. जेणेकरून यात्रेकरूला लवकर मदत मिळेल, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीनगर येथील खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे फैसल पटेल यांनी यांनी व्यक्त केली.