आता गड सर्वांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:29 IST2016-02-01T23:48:50+5:302016-02-02T00:29:41+5:30
प्रताप नलावडे , बीड दसरा मेळावा ही भगवानगडाची परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळावा नेहमीप्रमाणेच गडावर साजरा होईल, परंतु या मेळाव्यात कोणतेही राजकीय भाषण होणार नाही,

आता गड सर्वांसाठी खुला
प्रताप नलावडे , बीड
दसरा मेळावा ही भगवानगडाची परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळावा नेहमीप्रमाणेच गडावर साजरा होईल, परंतु या मेळाव्यात कोणतेही राजकीय भाषण होणार नाही, ही गडाच्या विश्वस्तांची, गडावर श्रध्दा असणाऱ्या भक्तांची आणि माझीही महंत म्हणून भूमिका आहे असे स्पष्ट करत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही सांगितले.
गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर शास्त्री यांच्या वक्तव्यावरून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दोन गडांच्या संदर्भाने वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. नेमकी भगवानगडाची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी लोकमतने भगवानगडावर शास्त्री यांच्याशी संवाद साधला.
श्रध्दा आणि राजकारण यांच्यात गफलत होता कामा नये, असे सांगत ते म्हणाले, मी काही कोठे एकट्या दुकट्याजवळ हे बोललो नाही तर गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ्यात आता भगवानगड हा श्रध्देचा तर गोपीनाथगड हा राजकारणासाठीचा असल्याचे रोखठोक सांगून टाकले होते.
आजवर गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी गडाचा राजकीय उपयोग झाला असला तरी आता श्रध्देच्या गडावर राजकारण नको आणि राजकीय भाष्य नको असे सांगत शास्त्री म्हणाले, माझ्या या निर्णयावर समाजातून कोणीही विरोध केलेला नाही.
यावर चर्चा आणि पत्रकबाजी सुरू झाली आहे ती कशी, असे विचारल्यावर ते म्हणाले, चार-दोन लोक याचा विपर्यास्त करत असतील तर त्यांचे म्हणणे म्हणजे संपूर्ण समाजाचे म्हणणे आहे, असे म्हणता येणार नाही. आणि लाभार्थी मंडळीच मला विरोध करतात. ज्यांच्या मनात समाजाविषयी श्रध्दा आहे, आदर आहे, त्यांनी माझा निर्णय मान्य केला आहे.
गडावरील व्यासपीठ का पाडले?
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर लगेचच नामदेव महाराज शास्त्री यांनी मुंडे ज्या व्यासपीठावरून गडावर भाषण करायचे ते व्यासपीठ पाडून टाकले होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मुंडे यांच्या उंचीचा नेता आता होणार नाही, ही त्यामागची भावना होती. शिवाय त्यांच्यानंतर आता गडावरून राजकीय भाष्य होणार नाही, असेही वाटत होते. परंतु मुंडे यांच्या निधनानंतर संपूर्ण समाज बिथरला होता. सैरभैर झाला होता. अशावेळी पंकजा यांच्या पाठीशी उभे राहणे मला आवश्यक वाटले आणि संत परंपरेचे ते कामच आहे. म्हणून मी पंकजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. आता त्या सत्तेत आहेत आणि सक्षम आहेत. शिवाय राजकीय भाष्य करण्यासाठी गोपीनाथगड आहे.
स्पर्धा कशी असेल?
भगवानगड आणि गोपीनाथगड या दोन गडांमध्ये आता स्पर्धा सुरू आहे का, असा थेट सवाल केल्यावर शास्त्री म्हणाले, या दोन गडांमध्ये स्पर्धा असण्याचे कारणच नाही. बीड जिल्ह्यात अनेक गड आहेत. आमची काय त्यांच्याशी स्पर्धाच आहे का? दोन्ही गडांचे कार्य वेगळे आहे. शिवाय आमच्या देणगीवर परिणाम होईल, अशी आम्हाला भीती वाटत असल्याचे काहीजण म्हणतात. परंतु तुम्हाला सांगतो, गेल्या बारा वर्षात या गडाला चेकने एक रूपयाही देणगी आलेली नाही. ऊसतोडणी मजूर, कामगार हे जमेल तशी देणगी आम्हाला देतात. त्यामुळे गडाचा कारभार धनदांडग्यांच्या जीवावर नाही तर मोलमजुरी करणाऱ्या सामान्य लोकांच्या सहकार्याने चालतो. आणि हे समजून घेतले पाहिजे की मी राजकारणी नाही आणि पंकजा ह्या कीर्तनकार नाहीत.
आमच्यात मतभेद नाहीत
या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यात मतभेद आहेत का, असे विचारल्यावर ते म्हणाले, आमच्यात मतभेद होण्याचे कारणच नाही. भगवानबाबांनी स्थापन केलेल्या या गडाला राजकीय मुक्तता मिळणे आवश्यक होते. ते काम मी केले आहे. उलट पंकजा ह्या सत्तेत असतानाही मी हा निर्णय घेतला आहे.
सत्येचा त्याग करून मी घेतलेला निर्णय हा समाजाला मान्य आहे. उद्या या गडाला उच्च विद्याविभूषित महंत मिळेल की नाही सांगता येत नाही. परंतु गड राजकारणापासून मुक्त असेल तर महंत म्हणून कोणीही या गादीवर आले तर त्याला गडाचा कारभार पाहणे सहज शक्य होईल.
गडाच्या महंतावर राजकीय दडपण असू नये, असे आपल्याला वाटते. ही भूमिका मी यापूर्वीही जाहिरपणे मांडलेली आहे. मी घेतलेली भूमिका सर्वसामान्यांच्या व गडाच्या हितासाठीच घेतलेली आहे.
भगवानगड हा सर्वांसाठी आता खुला झाला आहे, असे सांगत ते म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या अनुषंगाने बोलले जात आहे. पंकजा यांना दूर ठेऊन आम्ही आता धनंजय यांना गडाचे व्यासपीठ देणार आहोत, असाही धादांत खोटा प्रचार केला जात आहे. परंतु आजच हे स्पष्ट करतो की धनंजयच नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षाला आता गडाचा राजकीय वापर करता येणार नाही. श्रध्दा म्हणून कोणीही येऊ शकतो. सगळेच भगवानबाबांचे भक्त आहेत. भक्त म्हणून कोणालाही मज्जाव नाही.
गोपीनाथ मुंडे यांचे मोठेपण हे भगवानगडामुळेच होते, हे ते स्वत:ही मान्य करत असत, असे सांगत शास्त्री म्हणाले, भगवानबाबा हे त्यांचे गुरू होते. त्यांच्यासाठी पर्याय नव्हता म्हणून गडावरून त्यांना राजकीय भाष्य करावे लागले. त्यांचे बाबा हे भगवानबाबा होते तर पंकजा यांचे बाबा गोपीनाथ मुंडे आहेत. या अर्थानेच राजकीय भाष्य करण्यासाठी गोपीनाथगड योग्य असल्याचे मी सांगितले.