बाजारपेठेवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
By Admin | Updated: September 15, 2014 00:26 IST2014-09-15T00:23:03+5:302014-09-15T00:26:03+5:30
मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

बाजारपेठेवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर
उस्मानाबाद : शहरात वाढत्या चोऱ्या, समाजकंठकांकडून दुकानांवर होणारी दगडफेक या घटनांना आळा बसून यातील आरोपी तात्काळ जेरबंद व्हावेत, यासाठी या भागातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी रात्री गवळी गल्लीत सराफा तसेच इतर व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विष्णुदास सारडा, संतोष हंबीरे, महेश पोतदार यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, बंद, विटंबना या घटनांतही व्यापाऱ्यांची दुकानेच लक्ष्य ठरत आहेत. अशा घटना घडविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या समाजकंठकांवर तातडीने कारवाई होण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पोनि रायकर यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे सांगत व्यापाऱ्यांनीही पुढे येऊन समाजकंठकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे. शिवाय कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. अनुचित प्रकार घडविणाऱ्यांचे चित्र कॅमेऱ्यात बंद झाले तर आरोपींवर तात्काळ कारवाई करणे होपे होईल. त्यासाठी मुंबई, पुणे शहराच्या धरतीवर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पर्याय सूचविला. याला व्यापाऱ्यांनीही तात्काळ होकार दिला. तसेच यासाठी लागणारा सर्व खर्च वर्गणीतून करू, असे व्यापाऱ्यांनी रायकर यांना सांगितले.
यावेळी पोतदार यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तंत्र, बसविण्याची पध्दत, अपेक्षित खर्च याबाबत माहिती दिली. रायकर यांनीही व्यापाऱ्यांच्या पाठिणी पोलिस यंत्रणा खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला. शेवटी हंबीरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)