आता रेशन कार्डधारक सर्व रुग्णांना मिळणार मोफत उपचार
By Admin | Updated: June 16, 2014 01:10 IST2014-06-16T00:52:21+5:302014-06-16T01:10:53+5:30
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवर जारी केल्याची तारीख बंधनकारक असलेली अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला.

आता रेशन कार्डधारक सर्व रुग्णांना मिळणार मोफत उपचार
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवर जारी केल्याची तारीख बंधनकारक असलेली अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. या निर्णयामुळे केशरी, पिवळे रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना आता मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ रेशन कार्डवर तारीख नाही, म्हणून लाखो रुग्ण कालपर्यंत उपचारापासून वंचित राहिले होते.
राज्य शासनाने राज्यातील सर्व रेशन कार्डधारक कुटुंबांचा आरोग्य विमा उतरविला आहे. या योजनेंतर्गत रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना एक लाख रुपये खर्चापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे. कॅन्सर, हृदयविकार, मेंदूविकार, किडनीविकार या गंभीर आजारांवरील उपचारांसाठीही वेगवेगळे पॅकेज दिलेले आहेत. या योजनेमुळे राज्यातील गरीब रुग्णांना दिलासा मिळाला होता. मात्र, योजनेची अंमलबजावणी करताना घातलेल्या किरकोळ अटीमुळे सामान्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते.
याविषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. घाटीसारख्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात केवळ १० टक्के रुग्णांनाच जीवनदायी योजनेचा लाभ मिळत असल्याचे वृत्त दिले होते. ११७७ खाटांच्या या रुग्णालयात प्रत्यक्षात त्याहून अधिक रुग्ण अॅडमिट असतात. बाह्यरुग्ण विभागात १ हजार ८०० हून अधिक रुग्ण रोज दाखल होतात. मात्र, रेशन कार्डवर तारीख नाही या किरकोळ कारणामुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. रुग्णांना रेशन कार्डवर तारीख लिहून आणा, असे सांगितले जाते. तेव्हा त्यांना तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत. त्यातही दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. तेव्हा भीक नको, पण कुत्रे आवर, या म्हणीप्रमाणे रुग्ण जीवनदायी योजनेचे उपचार नको, असे म्हणू लागले होते.
दरम्यान, शासनाने जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवरील तारखेची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.