छत्रपती संभाजीनगर : व्यापाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून लूटमार करत अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख याची पुंडलिकनगर पोलिसांनी गारखेडा, भरतनगर, साईनगरमधून हातकड्यांसह पायी धिंड काढली. गुरुवारी सायंकाळी ५ ते ७ त्याला परिसरात फिरवण्यात आले. पोलिसी पाहुणचारामुळे लंगडत चालणाऱ्या टिप्याची त्याच्याच घरासमोरून धिंड जात असताना मात्र कावराबावरा झाला होता.
२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शेख अझर शेख (४०, रा. गारखेडा) यांना बीडबायपासवरील एका हॉटेलमध्ये धमकावून हुज्जत घातली. हॉटेलमधून बाहेर पडताच गारखेडा परिसरात त्यांना पकडून तलवारीचा धाक दाखवत दुचाकी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांच्याकडील अडीच लाख रुपये लुटून नेत वर १ लाख रुपयांची खंडणीदेखील मागितली. विशेष म्हणजे, घटनेच्या पंधरा दिवस आधीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो परराज्यात पसार झाला होता. त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली.
थेट न्यायालयात आला शरणपोलिस कठोर कारवाईच्या तयारीत असताना टिप्या २६ ऑगस्ट रोजी थेट न्यायालयात हजर झाला. त्यानंतर पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी ९ सप्टेंबर रोजी त्याला हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. न्यायालयाने त्याला या गुन्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
तब्बल २३ गुन्हे, तीन वेळा एमपीडीएटिप्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, विनयभंगाचे तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. त्याला तीन वेळा एमपीडीएअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. मात्र,तरीही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. अखेर, पोलिसांनी पहिल्यांदा त्याची परिसरात पायी धिंड काढत त्याच्या घरासमोरून फिरवले. सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, विनोद भालेराव, हेड कॉन्स्टेबल भीमराव राठोड, कल्याण निकम, अंकुश वाघ यांनी कारवाई केली.