पक्षादेश धुडकावणाऱ्या सात नगरसेवकांना नोटिसा
By Admin | Updated: August 15, 2014 01:11 IST2014-08-15T00:44:23+5:302014-08-15T01:11:43+5:30
औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही पक्षाच्याच नगरसेवकांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावल्याने तेथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. अशा सात नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पक्षादेश धुडकावणाऱ्या सात नगरसेवकांना नोटिसा
औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही पक्षाच्याच नगरसेवकांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावल्याने तेथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. अशा सात नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
दि. १७ जुलै रोजी पैठणच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत घोडेबाजार व आर्थिक व्यवहार घडल्याने काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.
काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितसिंग करकोटक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अॅड. युवराज काकडे व अॅड. शेट्टे यांच्या मार्फत तक्रार दाखल केली. यावर कार्यवाही होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक कमलाबाई लोहिया, सुधाकर तुपे, राजू गायकवाड, शेख अब्बास शेख कासम, शिल्पा पल्लोड, इनामोद्दीन अन्सारी, अजीम कट्यारे या सात नगरसेवकांना नोटिसा दिल्या.
दि. २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी हजर राहून आपले म्हणणे वकिलामार्फत सादर करण्याचे आवाहन केले आहे. या दिवशी आपले म्हणणे सादर न केल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी काँग्रेसचे राजू गायकवाड यांनी विरोधात मतदान केले, चौघे गैरहजर राहिले, तर दोघे सभागृहात हजर राहून तटस्थ राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब गायकवाड यांनीही शिवसेना-भाजपाला मतदान केले. काँग्रेस नगरसेवकांच्या या भूमिकेमुळेच शिवसेना व भाजपाचा विजय झाला, असे जितसिंग करकोटक यांनी याचिकेत म्हटले आहे. दि. २८ रोजी काय निकाल लागतो, याकडे पैठणकरांचे लक्ष लागून आहे.