आम्हाला काही होत नाही, असे म्हणून दुखणे अंगावर काढू नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:05 IST2021-04-21T04:05:57+5:302021-04-21T04:05:57+5:30
औरंगाबाद : शहरापेक्षा ग्रामीणची लोकसंख्या दुप्पट आहे. तपासणी वाढवल्याने रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. तो आकडा शहरापेक्षा अधिक ...

आम्हाला काही होत नाही, असे म्हणून दुखणे अंगावर काढू नका...
औरंगाबाद : शहरापेक्षा ग्रामीणची लोकसंख्या दुप्पट आहे. तपासणी वाढवल्याने रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. तो आकडा शहरापेक्षा अधिक असला तरी हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तपासणी वाढवून बाधितांना शोधून त्यांना वेळेवर उपचार देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोरोनाचे संक्रमण केवळ वयस्कांनाच नाही तर युवक, बालकांतही मोठ्या प्रमाणावर होतेय. आम्हाला काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढू नका आणि निर्बंधांचे पालन करून नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हाताच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.
गेल्या आठवडाभरात कोरोनाचे संक्रमण शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे. असे का होते आहे याविषयी डाॅ. गोंदावले म्हणाले, अंशतः लाॅकडाऊन, ब्रेक द चेन या काळात निर्बंध अधिक कडक असतानाच्या काळात जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन वेळेवर उपचार देण्याची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत असला तरी त्या तुलनेत ग्रामीणमध्ये १७ डीसीएचसी सुरू करण्यात आल्या. योग्य उपचार योग्य वेळी सुरू करण्यासाठी ग्रामीण डाॅक्टरांचे आज प्रशिक्षण घेतले. कोविड केअर सेंटरमध्येही आवश्यकतेपेक्षा अधिक खाटांची उपलब्धता आहे. याशिवाय होम आयसोलेशनमध्येही उपचार रुग्णांना ग्रामीण भागात दिले जात आहेत. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात यावे लागणार नाही. याशिवाय कोरोना रोखण्यासाठी नागरिकांत जनजागृती करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार ग्रामदक्षता समित्यांच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली. लसींच्या पुरवठ्यात अडचणी आल्या, तो प्रश्नही लवकरच सुरळीत होईल. सध्या २० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीसोबत जागरुक राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
----
बाहेरून आलेल्यांची माहिती द्या
गावात बाहेरगावाहून आलेले. बाधितांच्या संपर्कातील, कुंभमेळ्याहून आलेल्यांची माहिती प्रशासनाला देऊन त्या नागरिकांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हे जागरूक ग्रामस्थांच्या मदतीनेच शक्य होईल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. दुसऱ्या लाटेत केवळ वयस्क नव्हे, तर युवक आणि बालकांतही संसर्ग होतोय. तरीही मुले ट्रिपलसीट फिरताहेत. घोळक्यात खेळताहेत. आम्हाला काही होत नाही ही मानसिकता बदलून कोरोनाकडे गांभीर्याने बघायला हवे, असे डाॅ. गोंदावले म्हणाले.
---
तालुक्यातील अधिकारी म्हणतात.....
ग्रामीण भागातील रुग्ण तपासणी करून घेण्यासाठी लवकर येत नाहीत. पाच ते सहा दिवस खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊन दुखणे अंगावर काढतात. शेवटी तपासणीसाठी येतात. अशावेळी रुग्ण पॉझिटिव्ह येतो. मात्र पाच-सहा दिवसांत संपर्क आल्याने अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह निघते, अशा पद्धतीने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत आहे.
- डॉ. हेमंत गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी, कन्नड
--
सामाजिक अंतर न पाळल्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. शासनाने कडक निर्बंध लादूनही नागरिक नियम पाळत नाहीत. मास्कचा वापर न करणे, तसेच हात धुण्यासारखे साधे उपायही नागरिक विसरले आहेत. नागरिकांनी शासनाचे नियम न पाळल्याने, गर्दी वाढल्याने, तसेच वारंवार हात न धुता वावरल्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत.
- डॉ. गजानन टारपे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर
---
दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असून दुप्पट वेगाने पसरत आहे. शिवाय 'कम्युनिटी स्प्रेड'मुळे व नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने तालुक्यात रुग्णवाढ होत आहे. कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असून रुग्णवाढ लवकरच आटोक्यात येईल.
- सारिका शिंदे, प्रभारी तहसीलदार, गंगापूर