राज्यातच नव्हे, परराज्यांतही फोडल्या सहकारी बँका
By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:24:45+5:302014-08-18T00:37:54+5:30
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणाऱ्या कुख्यात उमप टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परराज्यांतही बँका फोडण्याचे अनेक गुन्हे केले आहेत.

राज्यातच नव्हे, परराज्यांतही फोडल्या सहकारी बँका
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणाऱ्या कुख्यात उमप टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परराज्यांतही बँका फोडण्याचे अनेक गुन्हे केले आहेत. औरंगाबादेत पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी नुकतीच टोळी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडून आली होती. या बँकेतून आरोपींनी साडेआठ लाख रुपये लुटले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
‘त्या’ गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कानपूर पोलिसांचे पथक औरंगाबादेत येणार असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
पाच दिवसांपूर्वी संशयावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी एपीआय कॉर्नर येथील लोकसेवा हॉटेलसमोर पाच आरोपींना पकडले होते. त्यावेळी आरोपींनी आपली खोटी नावे सांगितली. ‘खाक्या’ दाखविताच आरोपींनी खरी नावे सांतिगली. तेव्हा ही तर राज्यभरातील अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका फोडणारी उमप टोळी असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या हाती लागलेल्या या आरोपींमध्ये उमप टोळीचा म्होरक्या तथा कुख्यात गुन्हेगार सुरेश काशीनाथ उमप (५०, रा. कमळापूर, मोरशी, अमरावती, सध्या सातारा परिसर, औरंगाबाद) याच्यासह विजय भास्कर शिंदे (३०, रा. पिंपरी, हवेली, पुणे), अजिंक्य पांडुरंग सपकाळ (२१, रा. नवघर रोड, भायंदर, ठाणे), श्रीकांत ऊर्फ कान्हा किसनराव उमप (२४, रा. पार्डी, मोरशी, अमरावती) व अनिल शिवसागर दुबे (४७, रा. नालासोपारा, ठाणे) यांचा समावेश होता.
या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्रात बँक फोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तपासात या आरोपींनी ९ आॅगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची भिंत फोडून तिजोरीतील साडेआठ लाख रुपये लुटल्याची कबुली दिली. ती बँक फोडल्यानंतर हे आरोपी जीपने अमरावतीमार्गे औरंगाबादला आले होते, असेही तपासात समोर आले. आरोपींनी त्या बँकेतून लुटलेली रक्कम कोठे ठेवली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, हे आरोपी पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर कानपूर पोलिसांचे एक पथक औरंगाबादला येण्यासाठी निघाले आहे. या टोळीला कानपूर पोलीस अटक करून घेऊन जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक आघाव यांनी सांगितले.
लुटमारीच्या पैशांतून घेतला बंगला
या टोळीचा म्होरक्या सुरेश उमप याने २०११ मध्ये पुणे जिल्ह्यात काही बँका फोडल्या होत्या. त्यातून मिळालेल्या पैशांमधून त्याने औरंगाबादेतील देवळाई परिसरातील विजयनगरात एक आलिशान बंगला खरेदी केला होता.
पोलिसांनी ओळखू नये म्हणून चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून तो औरंगाबादेत स्थायिक झाला होता. येथून तो आपली टोळी आॅपरेट करीत असे.