शत्रू नव्हे मित्रच!
By Admin | Updated: August 1, 2014 00:26 IST2014-08-01T00:00:40+5:302014-08-01T00:26:02+5:30
बाळासाहेब जाधव, लातूर आपल्याकडे दिसला साप की मार, असे प्रकार नेहमीच घडतात.
शत्रू नव्हे मित्रच!
बाळासाहेब जाधव, लातूर
आपल्याकडे दिसला साप की मार, असे प्रकार नेहमीच घडतात. प्रत्यक्षात साप धोकादायक आणि विषारी असले तरी त्यांच्यामुळे शेतातील उंदरांचा बंदोबस्त होऊन धान्याची नासाडी होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे साप हा पर्यावरणाचा तोल सांभाळणारा प्राणी आहे, हे लक्षात येते; मात्र केवळ काही गैरसमजुतीतून हा सरपटणारा प्राणी संपविण्याचा सपाटा मानव जातीने लावला आहे. आज नागपंचमी... या उत्सवाच्या निमित्ताने सापांच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
श्रावण महिना हा सणावारांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या सुरुवातीलाच नागपंचमी येते. ‘चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायला, हळदीकुंकु वाहायला, ताज्या लाह्या वेचायाला’. या पंक्तीतून लोकसंस्कृतीत नागपूजेला दिलेले महत्त्व स्पष्ट होते. ग्रामीण भागात या सणाचे मोठे महत्त्व आहे. ग्रामीण भागातील जीवन हे कृषीवर अवलंबून आहे आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतकरी सापाची त्याची पूजा करतात. भारतीय संस्कृतीने सापाला दैवताचे स्वरूप दिले आहे. नागपंचमीच्या दिवशी झाडाला झोके बांधून झोके घेण्याचीदेखील प्रथा ग्रामीण भागात आहे. महिला या उत्सवाच्या निमित्ताने सासर-माहेरची गाणी म्हणतात. नागाला त्या आपला भाऊ मानतात. आजही ग्रामीण भागात मातीचे नाग बनवून अथवा नागाचे कागदी चित्र चिटकवून त्याची पूजा केली जाते. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी तळत अथवा भाजत नसत.
उकळलेले पदार्थ खाण्याची प्रथा होती. आता हे पाळले जात नाही. महाराष्ट्रात बत्तीस शिराळा आणि भीमाशंकर येथे नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. भारतभर हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर भारतात पुरुष दुधाची भांडी घेऊन वारुळाजवळ जातात व वारुळात दूध टाकतात. बंगाल व छोटा नागपूरमध्ये नागाची पूजा केली जाते.
बिहारमध्ये काही समाजातील स्त्रिया स्वत:ला नागपत्नी समजून सापांची गाणी गातात. कर्नाटकात या दिवशी गूळ-पापडीचे लाडू करतात. त्यांना ‘तांबीट’ असे म्हटले जाते. गुजरातमध्ये नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात व मूर्तीवर जलाभिषेक केला जातो. काशीमध्ये मिरवणुका काढल्या जातात.
नागपंचमी हा कृषी संस्कृतीशी निगडीत उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सापांचे संरक्षण करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचणे गरजेचे आहे.
सर्पमित्रांच्या संवर्धनासाठी समन्वय समिती
जखमी व पुनर्वसित सापांच्या संर्वधनासाठी शासनाची कुठलीही मदत मिळत नसली तरी सर्पमित्र म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भूमिका लक्षात घेवून लातूरच्या सर्पमित्रांनी सापांचे संवर्धन करण्यासाठी सर्पमित्र समन्वय समिती स्थापन केली आहे़ मुक्या प्राण्याशी मैत्री करणाऱ्या सर्पमित्रांची याद्वारे आगळीवेगळी चळवळ सुरू आहे़
सर्पदंश कसे टाळावेत?
धान्याच्या कोठारात उंदरांची संख्या वाढू देऊ नये़
सरपण व गवऱ्या घरालगत न ठेवता, काही अंतरावर ठेवाव्यात.
घराच्या भिंतीच्या कडा, भेगा व छिद्र त्वरित बुझवावे.
पशू-पक्षी घरात न ठेवता अंतरावर ठेवावे.
खिडक्या, दारावरच्या फांद्या दूर कराव्यात.
अंगणात झोपताना पलंग किंवा खाट वापरावी.
जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात साप बाहेर पडतात.
जनावरांमध्ये सर्पदंशाची लक्षणे
जनावरांना साप बहुधा पायाच्या खालील भागास चावतात. चरताना तोंडावर किंवा शेळ्या, मेंढ्याच्या स्तन-कासेवर सर्पदंश होतो.
विषारी सर्पदंश झाल्याबरोबर काही मिनिटात जनावर सैरावैरा धावते.
सर्पदंश तीव्र झाला तर, काही वेळातच जनावर चारा खाणे बंद करते.
जनावरांमध्ये लाळ गळणे, आडवे पडणे, पायास झटके देणे, डोक्यावर आपटी येणे, बुबुळ सुजणे, मान टाकणे, श्वासोच्छ्वासास त्रास, पोटशुळ उठणे, हगवण लागणे व तोंडातून फेस येणे आदी लक्षणं दिसतात.
दंश झालेल्या भागावर सुज येते. ही सुज पाणी भरल्यासारखी असते. काहीवेळा दंश झालेला भाग काळासुद्धा पडतो.
प्रथमोपचार
१. नाग व मण्यार साप चावल्यास दंडाला आणि पायाला चावल्यास मांडीला आवळपट्टी बांधावी.
२. आवळपट्टी १० मिनिटांनी सैल करीत राहावी.
३. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम मानसिक आधार द्यावा.
४. सर्पदंश झालेला अवयव हृदयापेक्षा वर नेऊ नये.
५. पायाला साप चावल्यास रूग्णास पायी घेऊन जाणे चुकीचे आहे. झोपवून नेल्यास रक्ताभिसरण क्रिया वाढून विष पसरत नाही.
साप हा उपयोगी प्राणी
एकूण राष्ट्राच्या धान्यापैकी ३० टक्के धान्य उंदीर नष्ट करतात. उंदरांची मादी वर्षाकाठी १५० ते २०० पिल्ले देते. म्हणजेच धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांवर साप हा एकमेव नैसर्गिक उपाय आहे, जो सर्वात जास्त उंदीर खाऊ शकतो. बिळात जाऊन उंदीर संपविण्याचे काम सापच करतो. त्यामुळेच साप हा संपूर्ण मानवजातीसाठी उपकारक आहे. अनेक असाध्य रोगांच्या औषधींसाठी सापांचे विष वापरले जाते.
विषारी साप चावल्यास दिसणारी लक्षणे
नाग व मण्यार सर्पदंशाची लक्षणे : नाग व मण्यार या सापांच्या विषांचा परिणाम मनुष्याच्या मज्जासंस्थेवर होतो. दंश झालेल्या जागी जळजळ होऊन थोडी सूज येते. थोड्या वेळाने मळमळून उलट्या व्हायला लागतात, पोटात आणि सांध्यात अतिशय वेदना होतात. अंग व डोळयांच्या पापण्यासुद्धा जड वाटायला लागतात. श्वास घेणे व बोलणे कठीण जाते. लाळ गळायला लागते. (विषबाधा ठी४१ङ्म ळङ्म७्रू)
घोणस व फुरसे सर्पदशांची लक्षणे : विषाचा परिणाम रक्तभिसरणावर होतो. दंश झालेला भाग फार जड वाटतो. तीव्र स्वरुपाच्या वेदना व जळजळ होते. जखमेभोवतालचा भाग लाल होऊन पातळ द्रव बाहेर येते. दंश भागावर सुज येते, नाक, तोंड तसेच लघवीद्वारे रक्तस्राव होतो. (विषबाधा ऌ्रेङ्म ळङ्म७्रू )