उत्तर-दक्षिणने रोखली मोदी लाट

By Admin | Updated: May 18, 2014 01:25 IST2014-05-18T01:22:36+5:302014-05-18T01:25:10+5:30

नांदेड : देश अन् राज्यात मोदीनाम जपाने वाहणार्‍या वार्‍याची दिशा किमान नांदेड लोकसभा मतदारसंघात बदलण्याचे काम नांदेड उत्तर अन् दक्षिण मतदारसंघात वेगाने झाले़

North-South Rokhli Modi wave | उत्तर-दक्षिणने रोखली मोदी लाट

उत्तर-दक्षिणने रोखली मोदी लाट

नांदेड : देश अन् राज्यात मोदीनाम जपाने वाहणार्‍या वार्‍याची दिशा किमान नांदेड लोकसभा मतदारसंघात बदलण्याचे काम नांदेड उत्तर अन् दक्षिण मतदारसंघात वेगाने झाले़ त्याला भोकरचीही साथ लाभली़ नाही म्हणायला देगलूरही आघाडीवर राहिले़, परंतु नायगाव आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाची झुळूक दिसून आली़ विशेषत: त्यांना मुखेडमध्ये दखलपात्र आघाडी मिळाली़ निकालाचे हे पडघम येणार्‍या विधानसभेसाठी कसे घुमतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे़ जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आणणारे नेतृत्वच निवडणुकीच्या मैदानात होते़ त्यामुळे देशात मोदी चालतील, मात्र जिल्ह्यात अशोकराव यावेत, अशी भूमिका मांडणारे कार्यकर्ते जागोजागी दिसत होते़ त्याची प्रचिती निकालानंतर आली आहे़ एकूणच निकालाची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिली तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ४३ हजार १५४ मतांची आघाडी काँग्रेसला मिळाली़ त्या खालोखाल दक्षिणमध्ये २३ हजार १९९ ची आघाडी राहिली़ म्हणजेच नांदेड शहर व परिसरातून ७० हजार २५० इतके मताधिक्य मिळाले़ भोकर विधानसभा मतदारसंघातही २३ हजार १९९ ची आघाडी राहिली़ नायगावमध्ये मात्र भाजपचे उमेदवार डी़ बी़ पाटील यांना ३ हजार ८४६ मतांची आघाडी मिळाली़ बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघातही भाजपा आघाडी घेणार, अशी चर्चा केली गेली़ तिथे मात्र नुकसान थोपविण्यात काँग्रेसला यश मिळाले़ परिणामी २ हजार ३३७ इतकी आघाडी काँग्रेसच्या खात्यात जमा झाली़ सर्वाधिक फटका मुखेड विधानसभा मतदारसंघात बसला़ तिथे ११ हजार १०२ मतांनी भाजपा पुढे राहिली़ माजी आ़किशनराव राठोड यांचा भाजपा प्रवेश असेल वा बेटमोगरेकर बंधुंवरील नाराजी असेल, कारण कोणतेही असो, भाजपाला सर्वाधिक मताधिक्य देणारा हा मतदारसंघ राहिला़ मत विभाजन किती व कसे ? निवडणूक म्हटले की समाज अन् जातीची गणिते मांडली जातात़ मुस्लिम व दलित मतांचे विभाजन किती व कसे होते यावर बराच काथ्याकुट केला जातो़ परंतु मतदारांनी समोर उमेदवार कोण याला अधिक महत्त्व दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते़ २००९ च्या निकालाशी तुलना केली असता २०१४ मध्ये मतविभाजन झालेले दिसत नाही़ बहुजन मुक्ती पार्टीचे राजरत्न आंबेडकर यांनी २८ हजार ४४७ मते मिळवित तिसरे स्थान पटकाविले़ त्या खालोखाल बसपा उमेदवार डॉ़हंसराज वैद्य यांना २२ हजार ८०९ मते मिळाली़ त्यामुळे काँग्रेस व भाजपा उमेदवारातच खरी लढत होवून दोन्ही पक्षाला ४ लाखांपेक्षा अधिक मते मिळाली़ एकमुखी नेतृत्व अन् भूमिका आमदार-खासदार निवडून आणण्याची जबाबदारी घेणारे नेतृत्वच निवडून येण्यासाठी उभे होते़ त्यामुळे अन्य कुठल्या नेत्याची भूमिका निकालावर परिणाम करणारी होती, असे चित्र नांदेडमध्ये नव्हते़ स्वत: अशोकराव चव्हाण हेच 'ब्रँड' म्हणून समोर आले़ त्यामुळे एकहाती प्रचार अन् यंत्रणा राबविली़ ७७ सभांचे तेच प्रमुख वक्ते होते़ नाही म्हणायला मोंढा मैदानावर मुख्यमंत्री, दिग्विजयसिंघ, शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मोठी सभा झाली़ याउलट भाजपाने नरेंद्र मोदी यांची सभा घेवून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्याला अशोकरावांनी एकहाती टक्कर दिली़ त्यांच्याच नावावर काँग्रेसला राज्यातील दोन जागांचा रकाना भरता आला़

Web Title: North-South Rokhli Modi wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.