मित्रपक्षाच्या मतदारसंघात ‘नोकझोंक’
By Admin | Updated: June 22, 2014 01:02 IST2014-06-22T01:00:13+5:302014-06-22T01:02:41+5:30
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद लोकसभेच्या निकालामुळे राजकीय सारिपाटावरील चाली बदलत असून त्यानुसार आपल्या सोंगट्या राजकीय पक्षाकडून हलविल्या जात आहेत.

मित्रपक्षाच्या मतदारसंघात ‘नोकझोंक’
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद
लोकसभेच्या निकालामुळे राजकीय सारिपाटावरील चाली बदलत असून त्यानुसार आपल्या सोंगट्या राजकीय पक्षाकडून हलविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आघाडी व युतीतील पक्षांनी आपल्या मित्र पक्षाच्या मतदारसंघातही समन्वयक, निरीक्षक नेमणे सुरू केले आहेत. काँग्र्रेसने २८८ मतदारसंघांत समन्वयक नेमले आहेत, तर शिवसेनेने या सर्व मतदारसंघांतून उद्धव ठाकरे यांना फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून भाजपा आपल्या ‘शतप्रतिशत भाजपा’ घोषणेवर ठाम आहे.
लोकसभेत मोदी लाटेने भाजपाचे ‘चांगले दिवस’ आणले; परंतु त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली राजकीय समीकरणे नव्याने मांडणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘स्वबळा’ची घोषणा करून राजकीय चर्चेला प्रारंभ केला. तोच काँग्रेसने परवा मुंबईत प्रदेश कार्यकारिणी बोलावून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत समन्वयक नेमले. संघटनात्मक कार्यक्रम, प्रचार व प्रसाराला अधिक गती देण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयक नेमल्याचे काँग्रेसतर्फे सांगितले जात आहे.
मुळात आघाडीतील काँग्रेस पक्ष विधानसभेच्या १७४ जागांवर लढतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आघाडीत विधानसभेचे ११४ मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वच जागांवर उमेदवार शोधून ठेवण्याच्या सूचना दिल्याचे स्थानिक पुढारी सांगतात.
लोकसभेत भाजपा मोठ्या ताकदीने राज्यात समोर आली. त्यामुळे राज्यात युतीत मोठा भाऊ कोण, यावरून चर्चा झडत आहेत. मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात घटक पक्षांना दिलेल्या स्थानावरून राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचे सूत्र कसे असेल, याची झलक त्यातून दिसते. त्यात भाजपाने प्रारंभीपासून ‘शतप्रतिशत भाजपा’चे ध्येय ठेवलेले आहे. या सुवर्णकाळात भाजपा या ध्येयाच्या दिशेने आक्रमकपणे समोर येण्याच्या हालचाली सुरू आहेत.
लोकसभेत दोन जागांपर्यंत पीछेहाट झाल्यामुळे काँग्रेसवर राष्ट्रवादी व २३ जागा जिंकून आपण मोठे दादा आहोत, या भूमिकेत शिरलेला भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करीत असल्याचे समोर आल्याने काँग्रेस व शिवसेनेने मित्र पक्षाच्या मतदारसंघातही समन्वयक, निरीक्षक नेमून ‘नोकझोंक’ करणे सुरू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरते आहे.
मोठा भाऊ कोण?
राज्यात युतीत मोठा भाऊ कोण, यावरून आता घमासान सुरू झाले आहे. भाजपाच्या शतप्रतिशतला शिवसेनेने ‘गाव तेथे शिवसेना व घर तेथे भगवा’, अशी घोषणा देऊन एका अर्थाने इशाराच दिला आहे.
सोबतच आगामी २३ जून ते २४ जुलै या काळात शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने भाजपाच्या मतदारसंघात दखल दिली नव्हती; परंतु या वेळेस भाजपाच्या मतदारसंघातही उद्धव बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
त्याला भाजपा कसे उत्तर देणार, हे भविष्यकाळाच्या पोटात दडलेले रहस्य आहे. आतापर्यंत शिवसेना १७१ व भाजपा ११७ जागा लढत होती. या वेळेस हे चित्र बदलण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.