एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहू देणार नाही- संतोष दानवे
By Admin | Updated: March 29, 2016 00:35 IST2016-03-29T00:22:54+5:302016-03-29T00:35:42+5:30
भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे मागील १३ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गांभिर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर

एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहू देणार नाही- संतोष दानवे
भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे मागील १३ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गांभिर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्राधान्यक्रमानुसार आराखडा तयार केलेला आहे. सदर आराखड्यानुसार आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन्ही तालुक्यातील एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहू देणार नाही, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.
वडोद तांगडा व वाढोणा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी रविवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ६० लाख रुपये किंमतीच्या वडोद तांगडा ते वालसावंगी फाटा रस्त्याच्या डांबरीकरण कामासह गावांतर्गत सिमेंट काँक्रिट रोड व समाजकल्याण विभागाच्या वतीने दलितवस्तीत मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच अजिंठा-बुलडाणा रोड ते कालिका माता संस्थान या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा सभापती कौतिकराव जगताप, सिद्धेश्वर कारखान्याचे गणपत बाबा सपकाळ, विलास आडगावकर, डॉ. प्रमोद कुलकर्णी, अॅड. विरेंद्र देशमुख, वालसावंगीचे सरपंच बाळूसेठ आहेर, धावड्याचे सरपंच बेलाप्पा पिसोळे, विझोऱ्याचे सरपंच सुभाष पा. गावंडे, भोरखेड्याचे सरपंच सोनुने, दामूअण्णा सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ, अण्णा पा. सोनुने, विलास भोंबे, इकबालखा पठाण, पदमसिंग राजपूत, श्रीरंग पा. खडके, सुखलाल बोडखे, रामदास शिरसाठ आदींची उपस्थिती होती.
आ. संतोष पाटील दानवे म्हणाले की, वास्तविक जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा केवळ वडोद तांगउा ते वालसावंगी फाटा व अजिंठा-बुलडाणा रोड ते कालिका माता मंदिर या दोनच रस्त्यांवर खर्च न करता मला चार-पाच लाखांची पंधरा वीस कामे मंजूर करून त्याद्वारे १५ गावांमध्ये विकासकामे मंजूर करता आली असती. परंतु मी तसे न करता या केवळ दोनच कामांवर प्रत्येकी ६० व ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)