'नो आयकार्ड, नो पेट्रोल'; कडक लॉकडाऊनमध्येही नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:07 IST2021-03-27T15:58:04+5:302021-03-27T16:07:56+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सध्या अंशतः लॉकडाऊन लागू आहे. यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू आहे.

'नो आयकार्ड, नो पेट्रोल'; कडक लॉकडाऊनमध्येही नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल पंपावर इंधन मिळणार असल्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र, असे असतानाही काही नागरिकही कडक लॉकडाऊन विसरून रस्त्यावर येत आहेत. आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोलसाठी गर्दी केली. परंतु, तिथे 'नो आयकार्ड, नो पेट्रोल' असे सांगितले गेल्याने अनेकांना गेटवरूनच परत जावे लागले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सध्या अंशतः लॉकडाऊन लागू आहे. यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू आहे. या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र, दिवसभराच्या कडक लॉकडाऊनमध्येही अनेक नागरिकही बाहेर पडत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच इंधन देण्यात आले.
आज सकाळपासून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसोबतच इतरांनीही पेट्रोल पंपावर गर्दी केली होती. तेव्हा त्यांना गेटवरच अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्राची मागणी करण्यात आली. विना ओळखपत्र वाहनाला आत प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे पेट्रोलपंपावर गर्दी आढळून आली. गर्दी वाढल्याने काही पेट्रोलपंपावर थोड्यावेळासाठी सेवा बंद ठेवण्यात आली. दरम्यान, गर्दी वाढत असल्याने पोलीस बंदोबस्तमध्ये इंधन वाटप सुरु करण्यात आले आहे.