लातूरात ‘नो एन्ट्री’
By Admin | Updated: January 14, 2015 00:57 IST2015-01-14T00:41:47+5:302015-01-14T00:57:15+5:30
उस्मानाबाद : अतिरिक्त ठरलेल्या ८२ निमशिक्षकांचे लातूर जिल्हा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या (झेडपी) शाळांमध्ये समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या

लातूरात ‘नो एन्ट्री’
उस्मानाबाद : अतिरिक्त ठरलेल्या ८२ निमशिक्षकांचे लातूर जिल्हा जिल्हा परिषदेअंतर्गतच्या (झेडपी) शाळांमध्ये समायोजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र सोमवारी येथील शिक्षण विभागात धडकले. ‘आमच्याकडे खाजगी शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यामुळे ८२ निमशिक्षकांना सामावून घेता येणार नाहीत’, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. अनेकवेळा धरणे, उपोषण आदी प्रकारची आंदोलने झाली. परंतु, रिक्त जागा नसल्याने शिक्षण विभागाकडूनही ‘जसजशा जागा रिक्त होतील, त्यानुसार नियुक्त्या देऊ’, हे ठरलेले उत्तर दिले जात होते. तर दीड-दोन महिन्यांपासून नवीन संच मान्यतेचे गाजर दाखविले जात होते. असे असतानाच शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या बैठकीत लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत जागा रिक्त असल्याचे समोर आले होते. त्यानुसार उपसंचालक खांडके यांनी लातूर ‘झेडपी’ला पत्र देवून ८२ अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याची एक प्रत उस्मानाबाद ‘झेडपी’लाही देण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला होता.
दरम्यान, उपसंचालकाच्या पत्रानुसार समायोजनाच्या अनुषंगाने प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. ही संचिका सामान्य प्रशासन विभागातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलावर गेली होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच लातूर जिल्हा परिषदेने खाजगी शाळांवरील अतिरिक्त शिक्षकांचे कारण पुढे करीत, ‘८२ निमशिक्षकांना घेता येणार नाही’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया थंड झाली असून लातूरकडून मिळालेल्या ‘रेड सिग्नल’मुळे शिक्षण विभागासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बदलीने लातूर जिल्हा परिषदेत जाण्यासाठी जवळपास ५२ ते ५५ गुरूजी इच्छुक आहेत. त्यामुळे अगोदर सदरील गुरूजींना येथून सोडावे.
त्यानंतर त्यांच्या जागी येथील अतिरिक्त गुरूजींचे समायोजन करावे. याउपरही जे कोणी अतिरिक्त ठरतील, त्यांनाच लातूर जिल्हा परिषदेकडे पाठवावे, अशी काही शिक्षकांची भूमिका आहे. तसेच याबाबत शिक्षक संघटनांनीही निवेदन दिले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार लातूर जिल्ह्यात जागा रिक्त आहेत. त्यामुळे सदरील रिक्त जागांवर अगोदर अतिरिक्त ठरलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांचा विचार केला जाईल. यानंतही जागा रिक्त राहिल्या तर त्या ठिकाणी खाजगी शिक्षांना सामावून घेण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगिले. याबाबत जिल्हा परिषदेला लवकरच पत्र काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
मागील काही महिन्यांपासून ४३ निमशिक्षक नियुक्तीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला खेट मारीत आहेत. परंतु, जागा रिक्त नसल्याने त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. असे असतानाच आता अतिरिक्त ठरलेल्या या ८२ शिक्षकांच्या नियुक्तीचा तिढा अधिक घट्ट झाला आहे.