मनपाचे ‘कारभारी’ विनापगारी !
By Admin | Updated: July 20, 2014 00:33 IST2014-07-20T00:21:11+5:302014-07-20T00:33:40+5:30
आशपाक पठाण , लातूर महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून वेतन रखडल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे़

मनपाचे ‘कारभारी’ विनापगारी !
आशपाक पठाण , लातूर
महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांपासून वेतन रखडल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे़ लातूर शहर महानगरपालिका स्थापनेपासूनच समस्यांच्या विळख्यात सापडली आहे़ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाचा मुद्दा काही प्रमाणात मार्गी लागल्यानंतर आता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गेल्या ६ महिन्यांपासून पगारी रखडल्या आहेत़ आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, १४ विभागप्रमुखांसह जवळपास २५० कर्मचारी मागील ६ महिन्यांपासून वेतनाविना काम करीत आहेत़ वेतन थकल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे़ यासंदर्भात कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत़
लातूर शहर महानगरपालिका स्थापनेपासूनच समस्यांच्या विळख्यात सापडली आहे़ अपुरे कर्मचारी, कामाचा वाढता ताण, विभागप्रमुखांची कमतरता, कर्मचाऱ्यांना कामाच्या शिस्तीचा अभाव त्यातच कचरा आणि पाणी या दोन विषयांची भर पडली आहे़ समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या महापालिकेची यातून सुटका होणे सध्या तरी कठीण झाले आहे़ एकीकडे नागरिकांची ओरड वाढलेली असता दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी वेतन रखडल्याने त्रस्त झाले आहेत़ प्रशासकीय कारभार चालविणाऱ्यांचेच वेतन थकल्याने कामावर परिणाम होत असल्याची चर्चा मनपात रंगली आहे़ महानगरपालिकेचे उत्पन्न कमी अन् खर्च अधिक होत असल्याने आर्थिक समस्या वाढल्या आहेत़
६७१ सफाई कामगारांना एप्रिल-मे पर्यंतचे वेतन देण्यात आले आहे़ महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना पाणीटंचाईच्या समस्येने त्यात भर टाकली आहे़ जानेवारी २०१४ पासून वेतन थकित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे़ यासंदर्भात मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख रमाकांत पिडगे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून वेतन थकित राहिल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ प्रशासनाने १ आॅगस्टपर्यंत थकित वेतन न दिल्यास आयुक्तांना निवेदन देऊन वेतनाची मागणी करण्यात येणार आहे़ त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल़ महापालिकेच्या वार्षिक उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेही शक्य होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़
२५ जुलै रोजी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे़ याशिवाय अन्य ८ विषयांवर चर्चा होणार आहे़
अधिकारी-कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत़़़
लातूर शहर महानगरपालिकेतील जवळपास २५० कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून थकले आहे़ विशेष म्हणजे, आयुक्त, उपायुक्तांचाही यात समावेश आहे़ शिवाय, १४ विभागप्रमुख, ६१ शिपाई आणि अन्य कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत़ मनपा स्थापनेपासूनच कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आर्थिक टंचाई असल्याने प्रशासन व नागरिकांची ओरड वाढली आहे़ थकित वेतनासंदर्भात १ आॅगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास अधिकारी-कर्मचारी आंदोलन करणार आहेत़
वार्षिक खर्च ३३ कोटींवऱ़़
लातूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन जवळपास १ कोटी ७५ लाख, पेन्शन, वीज बिल आदी एकत्रित खर्च जवळपास पावणेतीन कोटी रूपये आहे़ प्रॉपर्टी टॅक्स व एलबीटी हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे़ आर्थिक वर्ष २०१३-१४ चे प्रॉपर्टी टॅक्सची वसूलीही उद्द्ष्टिापेक्षा कमीच वसुली झाली़ शिवाय, स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून मिळणारे मासिक उत्पन्नही घटले आहे़ एकंदरीत उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनाचे वांदे झाले आहेत़ शिवाय, नागरी सुविधांवर विपरित परिणाम होत आहे़ मनपाचे उत्पन्न वाढल्याशिवाय, प्रशासकीय गाडा चालणे अशक्य झाले आहे़
तर मासिक ४ कोटींचे उत्पन्ऩ़़़
महापालिकेत अगोदरच कर्मचारी कमी आहेत़ त्यातच विविध समस्या निर्माण होत आहेत़ वेतन मिळावे, यासाठी एक दिवस काळ्या फिती लावल्या़ कामबंद आंदोलनही करण्यात आले आहे़ याप्रकरणी सोमवारी निर्णय होण्याची शक्यता असल्याने नगरसचिव ओमप्रकाश मुतंगे यांनी सांगितले़ उत्पन्नाचे मोठे साधन म्हणून एलबीटीकडे पाहिले जात होते़ एलबीटीच्या विषयावर ठामपणे तोडगा निघत नसल्याने काही व्यावसायिकांनी एलबीटी भरणा कमी केला आहे़ व्यापाऱ्यांकडून एलबीटी वेळेत आल्यास महिन्याला जवळपास ४ कोटींचे उत्पन्न पालिकेला होईल़ यातून शहर विकासाला मोठा हातभार लागेल़ त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य समस्या उद्भवणार नाहीत़