भूकंपाच्या अफवेने जागून काढली रात्र

By Admin | Updated: August 20, 2014 23:55 IST2014-08-20T23:41:14+5:302014-08-20T23:55:02+5:30

परभणी : जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर नागरिकांनी पहाटेपर्यंत जागरण केले.

The night after the earthquake rumors | भूकंपाच्या अफवेने जागून काढली रात्र

भूकंपाच्या अफवेने जागून काढली रात्र

परभणी : जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी मध्यरात्रीनंतर नागरिकांनी पहाटेपर्यंत जागरण केले. त्याला कारणही तसेच होते. रात्री २ ते ४ या वेळेत भूकंप होणार असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून रात्र जागून काढली. परंतु, अखेर ही अफवाच ठरली.
मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सर्वत्र फोना-फोनी सुरु झाली. पहाटे ४ वाजेपर्यंत भूकंप होणार असल्याची माहिती एकमेकांना फोनवरुन आपल्या नातलग व मित्र परिवाराला दिली. एक-एक करीत वसाहतीच्या वसाहती जाग्या झाल्या. परभणी शहरासह सेलू, पूर्णा, मानवत, गंगाखेड आदी तालुक्यामध्ये ही अफवा पसरत गेली आणि मध्यरात्रीपासून नागरिक जागे झाले. अनेक भागात वसाहतींमधील मोकळ्या जागी एकत्र येऊन नागरिकांनी रात्र काढली. पहाटेचे ४ वाजले. परंतु, भूकंप काही झाला नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दूरध्वनी आणि मोबाईलवरुन ही माहिती सर्वत्र पसरविण्यात आली. परंतु, कुठलाही आधार नसलेले हे वृत्त खात्रीशीर वाटत नसतानाही अनेकांनी रात्र जागून काढली.
एक मुलगा जन्माला आला असून त्याने जन्मल्यानंतर आज रात्री भूकंप होणार असल्याचे सांगितले, अशी अफवा पसरविण्यात आली होती. त्यात वेगवेगळ्या जणांना याच माहितीचा परंतु, गावांची नावे बदलून फोन करण्यात आल्याचे सकाळी स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
गंगाखेडातही अफवांचे पेव
भूकंप होणार अफवेने शहराच्या विविध भागातील नागरिक कुटुंबीयासह मध्यरात्री रस्त्यावर येऊन रात्र जागून काढली़ गंगाखेड शहरात रात्री दोन वाजेच्या सुमारास बाहेरगावी राहत असलेला नातेवाईकांकडून भुकंप होणार असल्याची माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली़ शहराच्या जुन्या वसाहतीतील हटकर गल्ली, धनगर गल्ली, खडकपुरा, तारुमोहल्ला, टोले गल्ली, गौतमनगर, अजिंठानगर व बसस्थानक परिसरातील नागरिक जागे झाले़ अनेक कुटूंब आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत तर काहींनी रस्त्यावर बस्तान मांडले़ पहाटे ४ वाजेपर्यंत हा प्रकार शहरात चालू होता़ असाच प्रकार ग्रामीण भागातील अनेक गावात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली़ अफवेमुळे त्रस्त झालेल्या कुटुंबांनी दिवस उजाडण्याच्या सुमारास घरात प्रवेश केला़
पूर्णेतही जागरण
हॅलो तुमच्याकडे काय झाले ? असा फोन रात्रीच्या सुमारास अनेकांना आला. भूकंप होणार असल्याची अफवा तालुक्यातील ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पोहचली आणि हजारो नागरिक या अफवेचे बळी पडले. १९ आॅगस्टच्या रात्री ११ नंतर भूकंप होणार असल्याच्या अफवेचे पेव फुटले. मोबाईलद्वारे ही अफवा दूरदूरपर्यंत पोहचली. त्यानंतर सुरु झाले, चौकशीचे सत्र. परंतु, कुठेही काहीही झाले नाही. अनेकांनी सिमेंटची घरे सोडून दूर अंतरावर धूम ठोकली होती.

Web Title: The night after the earthquake rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.