नव्या साहित्यप्रवाहांची चिकित्सा समीक्षेने व्हावी
By Admin | Updated: September 9, 2014 23:59 IST2014-09-09T23:44:38+5:302014-09-09T23:59:23+5:30
नांदेड: मराठीत निर्माण होणाऱ्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा मराठी समीक्षेनं करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ़ गंगाधर पानतावणे यांनी केले़

नव्या साहित्यप्रवाहांची चिकित्सा समीक्षेने व्हावी
नांदेड: मराठीत निर्माण होणाऱ्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा मराठी समीक्षेनं करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ़ गंगाधर पानतावणे यांनी केले़
साहित्य अकादमी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भाषा संकुलाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ ज्येष्ठ समीक्षक डॉ़ दिगंबर पाध्ये, कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, संचालक डॉ़ रमेश ढगे, समन्वयक डॉ केशव सखाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ पानतावणे म्हणाले, १९६० नंतर मराठी साहित्यामध्ये जे वाङ्मयीन प्रवाह आले ते सर्व जीवनाच्या परिवर्तनाची मागणी करणारे होते़ जीवनवास्तवाशी त्याचा संबंध होता़ मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही़ रा़ ग़ जाधव, भालचंद्र फडके यासारख्या साठोत्तरी समीक्षकांनी मूलभूत चर्चा केली असली तरी इतरांनी फारसा आग्रह धरला नाही़ आजचे मराठी समीक्षक पान्हा चोरणारे आहेत़ समीक्षकांकडे स्वागतशीलवृत्ती असायला हवी़ जीवनानुभवांचे नवे पैलू मांडणाऱ्या साहित्यापर्यंत समीक्षकांनी जायला हवे़ उत्तम आणि अभिजात साहित्याची दखल समीक्षेनं घेतली तर स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षा एक मानदंड निर्माण करु शकेल़
मराठीतील प्रसिद्ध समीक्षक डॉ़ दिगंबर पाध्ये म्हणाले, समीक्षा हा साहित्योपजीवी व्यवहार आहे़ प्रत्येक काळातील साहित्याला त्या-त्या काळाचा संदर्भ असतो़ १९७५ नंतर समीक्षेत एकामागून एक सिद्धांत मराठीत आले़ नवे पारिभाषिक शब्द आले़ त्यामुळे समीक्षा समृद्ध झाली़ ब्रिटिश राज्यसत्तेशी आणि आधुनिकतेशी आपला संबंध आल्यानंतर मराठी समीक्षेचा उदय झाला़ पूर्वी केवळ धार्मिक साहित्याला प्रतिष्ठा होती़ मात्र समीक्षेनं वाचकांनी काय वाचावे? हे समजावून सांगितले़ स्वरुपलक्ष्मी समीक्षा लोप पावतेय़ त्यामुळे आजची मराठी समीक्षा क्रियाशील असल्याचे खऱ्या अर्थाने म्हणता येत नाही़
कुलगुरु डॉ़ विद्यासागर म्हणाले, आज भाषेचा गांभीर्याने विचार केला जात नाही़ भाषा, साहित्याचे आकलन होण्यासाठी चर्चासत्र उपयुक्त माध्यम ठरु शकेल़ समीक्षक हा एकांगी असू नये तर त्याने कसा आणि माणूस या दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हव्यात़
दिवसभर चाललेल्या चर्चासत्रात डॉ़ तु़ श़ कुलकर्णी आणि डॉ़ एल़ एस देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ़ सतीश बडवे, नीळकंठ कदम, डॉ़ अरुणा दुभाषी, डॉ़ आशुतोष पाटील, डॉ़ रामचंद्र काळुंखे यांनी अभ्यासपूर्ण निबंध सादर केले़ प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी चर्चासत्राचा समारोप झाला़ नीळकंठ कदम, श्रीधर नांदेडकर, केशव देशमुख, पी़ विठ्ठल, पृथ्वीराज तौर या निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले़ संचालक डॉ़ रमेश ढगे यांनी आभार मानले़ यावेळी अनेकांची उपस्थिती होती़
(प्रतिनिधी)