मनातल्या उन्हातील तात्याच्या रुपाने मिळाली नवीन ओळख
By Admin | Updated: August 10, 2015 00:56 IST2015-08-10T00:45:04+5:302015-08-10T00:56:35+5:30
जालना : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि लेखक राजकुमार तांगडे यांच्या विविध नाटकांत काम करण्याची संधी मिळाली.

मनातल्या उन्हातील तात्याच्या रुपाने मिळाली नवीन ओळख
जालना : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि लेखक राजकुमार तांगडे यांच्या विविध नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. यातूनच अभिनयाला दिशा मिळत गेली आणि विविध नाटकांतून साकारलेल्या भूमिकाची दखल म्हणून ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटात तात्याची भूमिका मिळाली. याच व्यक्तीरेखेने आपल्याला समाजात नवीन ओळख मिळवून दिली, अशी माहिती अभिनेता कैलास वाघमारे याने दिली.
जालना लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिल्यानंतर संपादकीय सहकाऱ्यांशी कैलासने मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्याने विविध विषयांवर आपली ठाम मते व्यक्त केली. अभिनय क्षेत्रातील आतापर्यंतचा प्रवास उलगडत मायानगरी मुंबापुरीत सर्व ज्येष्ठ कलाकारांचे कसे सहकार्य मिळत गेले आणि नाट्यक्षेत्र ते मराठी चित्रपटसृष्टी असा प्रवास त्याने मांडला. मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्राची पदवी संपादन करण्यासाठी व प्राध्यापक होण्याची इच्छा बाळगून मुंबईत गेलेला अभिनय क्षेत्रात कसा गेला, याचा अनुभव त्याने कथन केला. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंदे्र, चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासमवेत विविध नाटकांतून केलेल्या कामाचा अनुभव कथन केला. ‘माझी शाळा’, या नाटकात मुख्य भूमिका मिळाली. मात्र, खरे व्यासपीठ शिवाजी अंडर ग्राऊड इन भीमनगर मोहल्ला, या नाटकाने मिळवून दिले. या नाटकाचे तब्बल ४५० प्रयोग राज्यभर झाले. हे नाटक सर्वत्र गाजले. मात्र आपल्या मायभूमीतच या नाटकाचे प्रयोग झाले नाही, याची खंत त्याला आहे.
मनातल्या उन्हात या चित्रपटात तात्या ही व्यक्तीरेखा साकारताना तेथील स्थानिक भाषाशैली व विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या बाबींवर बारकाईने अभ्यास केल्यानेच ही भूमिका परिपूर्णपणे साकारू शकलो. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते मिताली जगताप, नागेश भोसले, कवी किशोर कदम यांच्यासोबत काम करणे म्हणजे मनावर दडपण होते. पण या सर्व ज्येष्ठ कलावतांनी सहकार्य केल्यानेच तात्या ही व्यक्तीरेखा सहजपणे साकारु शकलो आणि या भूमिकेला न्याय देऊ शकलो.
अभिनय क्षेत्रात कुठल्याही चौकटीत न अडकता भविष्यात विविध प्रकारच्या भूमिका करायला आवडेल, अशी मनीषा कैलासने बोलून दाखविली. जालना शहरातील नाट्य आणि सास्कृंतिक चळवळ गतिमान व्हावी, अशी अपेक्षा कैलासने यावेळी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)