व्यापार क्षेत्राच्या विकासाचे नवे पर्व वेगात
By Admin | Updated: August 25, 2014 00:23 IST2014-08-25T00:17:34+5:302014-08-25T00:23:27+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बाजारपेठेने काळाच्या ओघात कात टाकून नवीन रुपडे धारण केले आहे.

व्यापार क्षेत्राच्या विकासाचे नवे पर्व वेगात
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बाजारपेठेने काळाच्या ओघात कात टाकून नवीन रुपडे धारण केले आहे. एकेकाळी जुन्या पारंपरिक पद्धतीची दुकाने होती, तिथे मोठमोठ्या चकचकीत शोरूमची निर्मिती झाली. सर्व व्यवहार संगणकावर आला. एवढेच नव्हे तर मागील पाच ते दहा वर्षांत राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय ब्रँडेडने आपले मोठे मार्केट येथे उभे केले. शहरवासीयांना मॉलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा मिळू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळात औरंगाबाद हे शहर देशातील व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते. मागील पाच ते दहा वर्षांपासून पुन्हा औरंगाबादेतील व्यापार क्षेत्राचे विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. शहराचे हृदयस्थान असलेला गुलमंडी, शहागंज परिसर व मोंढा हीच पूर्वी मुख्य बाजारपेठ होती. मात्र, शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत गेला आणि बाजारपेठेची व्याप्तीही वाढत गेली. शहरातील पारंपरिक बाजारपेठ म्हणजे गुलमंडी, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगार गल्ली, मछली खडक, भांडी बाजार, कासारी बाजार, सिटीचौक, शहागंज, राजा बाजार, जाधवमंडी, मोंढा, दिवाणदेवडी, रोशनगेट, बुढीलेन, चेलीपुरा हा परिसर मानला जातो. नवीन बाजारपेठेत निराला बाजार, उस्मानपुरा, सिडको कॅनॉट प्लेस, जालना रोड, हडको, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी, सूतगिरणी परिसर, काल्डा कॉर्नर इ. परिसराचा समावेश होतो. जिल्हा व्यापारी महासंघातून मिळालेल्या माहितीनुसार १० वर्षांपूर्वी शहरात १४ ते १५ हजार व्यापारी होते. आजघडीला ही संख्या २६ ते २७ हजारांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. डीएमआयसी व स्मार्टसिटीमुळे भविष्यात आणखी ३ ते ४ हजार नवीन व्यापारी निर्माण होतील. यामुळे येथील बाजारपेठेतील स्पर्धा आणखी वाढेल. त्याचा अंतिमत: फायदा शहरवासीयांनाच होणार आहे. मॉल संस्कृतीत ग्राहक राजा मुंबई, पुणे, नाशिक या बड्या शहरांनंतर औरंगाबादेत मॉल संस्कृती रुजली. शहरात एकानंतर एक मॉल सुरूझाले. हजारो वस्तूंमधून एक वस्तू निवडण्याची मुभा या मॉलने ग्राहकांना दिली. तसेच डिस्काऊंट आॅफर, नवनवीन खरेदी योजना, सणासुदीच्या दिवसांतील खास अभिनव योजना राबवून ग्राहकांना आकर्षित केले. मराठवाड्यातील सर्वांत मोठे प्रोझोन मॉल औरंगाबादची शान ठरत आहे. सोन्याच्या नामांकित पेढ्या शहरात पूर्वी शुद्ध सोने खरेदीसाठी औरंगाबादकरांना जळगाव, पुणे येथे जावे लागत असे; पण मागील ५ वर्षांत या शहरातच राज्यातील सोन्याच्या नामांकित पेढ्यांनी आपले शोरूम सुरूकेल्याने आता ग्राहकांना येथेच शुद्ध सोने व नावीन्यपूर्ण डिझाईनचे दागिने मिळत आहेत. यामुळे दागिने खरेदीसाठी मराठवाड्यातून ग्राहक शहरात येत आहेत. कासारी बाजार, सराफा रोड हीच पूर्वी सोने- चांदीची पारंपरिक बाजारपेठ होती. मात्र, आता समर्थनगर, जालना रोड, कॅनॉट प्लेस, जवाहर कॉलनी या परिसरातही सोने- चांदीची बाजारपेठ निर्माण झाली आहे. जळगाव, पुणे येथील नामांकित पेढ्यांनी शोरूम सुरूकेल्याने ग्राहकांना दागिने खरेदीत मोठा वाव मिळाला आहे. याशिवाय येत्या काळात एकाच छताखाली ४० पेक्षा दुकानांत दागिने खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. वार्षिक १२ हजार कोटींची उलाढाल मागील पाच वर्षांत औरंगाबादेतील व्यापाराचा विस्तार झाला आणि व्यावसायिक उलाढालही वाढली. यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले की, एलबीटीपोटी मनपाच्या तिजोरीत व्यापारी १९८ कोटी रुपयांचा महसूल जमा करीत आहेत. औरंगाबादेतील बाजारपेठेत वार्षिक ९०० ते हजार कोटींची उलाढाल होते. त्यात निर्यातीचा आकडा विचारात घेतला, तर एकूण १२ हजार कोटींपर्यंत उलाढाल जाऊन पोहोचली आहे. मोंढ्यात परिवर्तन १० वर्षांपूर्वी मोंढ्याचे विभाजन झाले. किरकोळ व होलसेल मार्केट जुन्या व नव्या मोंढ्यात राहिले व अडत व्यापार जाधववाडीतील बाजार संकुलात स्थलांतरित झाला. यामुळे जुना मोंढ्यातील वाहतुकीचा ताण खूप कमी झाला. मॉलमध्ये किराणा व जीवनावश्यक वस्तूंची सर्वाधिक विक्री होते हे लक्षात घेऊन मोंढ्यातील व्यापाऱ्यांनीही आपल्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल केला. अनेक जुनी दुकाने पाडून त्यास आधुनिक रूप दिले. किराणा दुकानेही आता शोरूम बनली. मॉलप्रमाणे येथेही दुकानात फिरून ग्राहकांना मनपसंत माल घेता येतो. आजही मोंढ्यात ७० ते ८० वर्षांपूर्वीची दुकाने पाहावयास मिळतात. जुनी संस्कृती टिकविण्यावर काही व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. मॉलशी स्पर्धा करण्यासाठी मोंढ्यातील व्यापारी एकत्र येऊन ओपन मॉलची संकल्पना राबवीत आहेत. आठ-दहा व्यापाऱ्यांनी एकसाथ बंपर माल मागविल्याने तो स्वस्त पडतो. याचा फायदा ग्राहकांना होत आहे. २०१० मध्ये एप्रिल महिन्यात औरंगाबादकरांनी जागतिक विक्रम केला. या महिन्यात शहरवासीयांनी एकाच वेळी १५० मर्सिडीज खरेदी करून शहराची आर्थिक व व्यापारी ताकद अधोरेखित केली. यानंतर सर्वांचा औरंगाबादकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. उद्योजक सचिन मुळे यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी चारचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या शहरात १२ शोरूम होत्या. दीडशे मर्सिडीज शहरात आल्यानंतर विदेशी कंपन्यांनी येथे आपल्या शोरूम सुरूकेल्या. आजघडीला १४ कंपन्यांच्या १८ शोरूम शहरात कार्यरत आहेत. २ लाखांपासून ते १ कोटीपर्यंत किंमत असलेली चार चाकी वाहने शहरात विक्री होतात.