पुलांंसाठी निधीची नव्याने घोषणा
By Admin | Updated: January 17, 2016 23:55 IST2016-01-17T23:49:51+5:302016-01-17T23:55:26+5:30
औरंगाबाद : मकई दरवाजा, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा या तिन्ही ऐतिहासिक दरवाजांसमोर खाम नदीवरील पुलांचे काम तीन वर्षांपासून निधीअभावी रखडले

पुलांंसाठी निधीची नव्याने घोषणा
औरंगाबाद : मकई दरवाजा, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा या तिन्ही ऐतिहासिक दरवाजांसमोर खाम नदीवरील पुलांचे काम तीन वर्षांपासून निधीअभावी रखडले असून, त्या तिन्ही पुलांसाठी रविवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी २७ कोटींचा निधी देण्याची नव्याने घोषणा केली. २७ कोटी रुपयांचा निधी त्या पुलांसाठी येत्या चार दिवसांत मिळणार असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी बोलणे झाल्याचेही कदम यांनी सांगितले. डीपीसीच्या बैठकीनंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकारांशी चर्चा केली.
पुलांच्या नूतनीकरणासाठी नवीन डीएसआरनुसार २५ ते २७ कोटी रुपये खर्च लागण्याचा अंदाज गेल्या वर्षीच लावण्यात आला होता. मनपाऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते काम वर्ग करण्यात आले; परंतु बांधकाम विभागाला त्या पुलांच्या कामासाठी कुठलेही आदेश व अनुदान तीन वर्षांत मिळाले नाही. मागील सरकारने तिन्ही पुलांच्या कामासाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले. विद्यमान शासनाने मे २०१५ मध्ये एका पुलासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. रविवारी पुन्हा २७ कोटींची नवीन घोषणा झाली आहे. बारापुल्ला, मेहमूद आणि मकई येथील दरवाजांजवळील पूल जुने झाले आहेत. त्यापैकी एका पाणचक्की येथील पुलाला वक्फ बोर्डाकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. पुलावरून पाणचक्की, मकबऱ्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे पूल चांगले असणे गरजेचे आहे. पुलाच्या नूतनीकरणासाठी मनपाकडे १० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात येणार होता. अजून तो निधी आलेला नाही.